Maharashtra Weather Forecast : राज्यात पावसाचा ब्रेक, पुण्यासह ६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर कुठे विश्रांती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । राज्यात उशिरा दाखल झालेला मान्सून तुफान बरसल्यानंतर गेल्यो दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. राज्यात बहुतांश भागात पावसाने दडी मारली असून पुढचे काही दिवस असाच पावसाचा लपंडाव पाहायला मिळणार आहे. अशात अधून-मधून पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे काही महत्त्वाच्या शहरांना आजही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागांमध्ये आजही पावसाचा जोर असणार आहे. विदर्भातही अनेक भागांमध्ये हलका पाऊस होईल अशी शक्याता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाची उसंत पाहायला मिळेल.

दरम्यान, गेले दोन आठवडे सतत पडणारा पाऊस…ढगाळलेल्या आभाळामुळे मंदप्रकाशात चाचपडणारे मुंबईकर रविवारी पावसाने घेतलेल्या ‘सुट्टी’ने आणि सूर्यदर्शनाने सुखावले. सातत्याने दमट वातावरणामुळे अनेक आजारांशी लढा द्यावा लागत असल्याने मुंबईकर पाऊस उघडण्याची वाट पाहत होते. शनिवारी एखाद-दुसऱ्या ठिकाणी जोरदार सर अनुभवल्यानंतर रविवारचा दिवस मात्र तुलनेने कोरडा गेला. यामुळे तापमानातही लगचेच बदल जाणवायला सुरुवात झाली.

कुठे, किती पाऊस कोसळणार?
भारतीय हवामान विभागाने रविवारी पाच दिवसांसाठी वर्तवलेल्या पावसाच्या शक्यतेनुसार, रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतील. तर बुधवार, गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. पालघर जिल्ह्यातही मंगळवारपर्यंत मध्यम सरींचीच शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरी पडू शकतात. ठाणे जिल्ह्यात आठवड्याची सुरुवात मध्यम सरींनी होऊन त्यानंतर मंगळवार ते गुरुवार या दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *