महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । मंडई, तुळशीबाग, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता ही पुणेकरांची जिव्हाळ्याची ठिकाणे. जग फिरून झाले, इंटरनेटवर बक्कळ खरेदी केली, तरी या ठिकाणांना वरचेवर भेट दिल्याशिवाय पुणेकरांच्या जिवाला चैन पडत नाही; पण गेल्या दहा वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या इतकी बिकट होत गेली, की या भागात येणे-जाणे त्रासदायक ठरले. वाहतूक कोंडी आणि पार्किंग या दोन समस्यांनी मध्य पुण्याला वेढले.
आता यातून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळेल तो मेट्रोमुळे. स्वतःचे वाहन वापरण्यापेक्षा २५ ते ३० मिनिटांत आणि परवडणाऱ्या तिकीटदरात मेट्रोतून शहराच्या मध्य भागात सहजपणे ये-जा करता येईल. वाहतूक कोंडीत अडकलेल्या मध्य पुण्याची प्रतिमाही बदलेल आणि पुण्याला आणखी वेग येईल, अशी आशा मेट्रोमुळे पल्लवित झाली आहे!
विस्तारित मार्गांचा या भागाला होणार फायदा
वनाज – गरवारे कॉलेज ते रूबी हॉल क्लिनिक
वनाज, शिवतीर्थनगर, शास्त्रीनगर, केळेवाडी, एरंडवणे, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शनिवार पेठ, नारायण पेठ, महापालिका भवन, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन आदी
वनाजवरून आता थेट डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, बालगंधर्व, महापालिका भवन, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन, ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग, रूबी हॉल परिसरात पोहचणे शक्य.
वनाजवरून शिवाजीनगर न्यायालय स्थानकात मेट्रो बदलून पिंपरी-चिंचवडच्या दिशेनेही पोहोचणे शक्य
पिंपरी-चिंचवड – फुगेवाडी – शिवाजीनगर न्यायालय
पिंपरी-चिंचवड, काळेवाडी, नाशिक फाटा, फुगेवाडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स, कृषी महाविद्यालय आदी
पिंपरी-चिंचवडवरून पुणे रेल्वे स्टेशन, तसेच शिवाजीनगर न्यायालय स्थानकातून मेट्रो बदलून, महापालिका भवन, संभाजी उद्यान, डेक्कन जिमखान्यापर्यंत पोचणे सहज शक्य
पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना मध्य पुण्यात पोचणे सहज शक्य
विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत
शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ओळखपत्राद्वारे तिकीट दरात ३० टक्के सवलत मिळणार
सर्व नागरिकांना दर शनिवार- रविवारी तिकीट दरात ३० टक्के सवलत मिळणार
या घटकांना होणार फायदा
सेंट्रल बिल्डिंग, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी जाणाऱ्या, तसेच डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता या परिसरात जाणाऱ्या नागरिकांची सोय
शिवाजीनगर न्यायालय स्थानक –
१९ सरकते जिने व ८ लिफ्ट
जमिनीखाली १०८ फूट
प्लॅटफॉर्मवर सूर्यप्रकाश पडेल असे बांधकाम
दोन मार्ग एकमेकांना मिळणार
भविष्यात हिंजवडी मेट्रोमार्ग शिवाजीनगर स्थानकाला पादचारी पुलाने जोडणार
शिवाजीनगर (रेंजहिल्स) भूमिगत स्थानक –
छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांसारखी रचना
रेल्वे, पीएमपी आणि हिंजवडी मेट्रो तसेच एसटी स्थानक जोडले जाणार
५ लिफ्ट आणि १० सरकते जिने
सिमला ऑफिस चौक, शिवाजीनगर एसटी व रेल्वे स्थानक, नारायण पेठ भागाशी जोडले जाणार
पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंसारखी सजावट
तिकीट कसे मिळेल
प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे तिकीट हे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मिळेल.
स्थानकावर तिकीट व्हेंडिंग मशिन उपलब्ध असते. तिथे प्रवाशांना डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढता येईल.
मेट्रोचे महा कार्ड व पुणे मेट्रो ॲपच्या माध्यमातूनदेखील तिकीट काढणे शक्य आहे.
ज्या प्रवाशांना व्हाट्सॲपवरून तिकीट काढायचे आहे. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ९४२०१०१९९० हा क्रमांक सेव्ह करावा
व्हाट्सॲपवरून संबंधित क्रमांकावर हाय (hi) असा मेसेज करणे, त्यानंतर बुक तिकीट असा पर्याय येईल.
बुक तिकीट हा पर्याय निवडल्यानंतर प्रवासाचा तपशील द्यावा व पेमेंटचे पर्याय निवडावेत
पेमेंट केल्यावर क्यूआर कोड येईल, तोच क्यूआर कोड प्रवासाआधी डिस्प्ले बोर्डवर स्कॅन करणे
‘पीएमपी’ची आजपासून फीडर सेवा
प्रवाशांना मेट्रोच्या स्थानकावर येण्यासाठी व तेथून जवळच्या भागात जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाची मंगळवारपासून फीडर सेवा
यासाठी सात बसचा वापर होणार
शिवाजीनगर न्यायालयापासून तीन बस वर्तुळाकार मार्गावर धावणार
दोन बस पिंपरी-चिंचवड स्थानकापासून काळेवाडी फाटा, घरकुल मार्गासाठी
नाशिक फाटा ते संतनगर, भोसरी दरम्यान एका बसची सेवा
दापोडी ते नवी सांगवी दरम्यान एक बस धावणार
या बस दर एक तासाने धावणार