महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । एलन मस्कने त्याच्या ट्विटरच्या मुख्यालयावर मोठ्ठा चमकदार एक्स लावून साऱ्यांचेच डोळे खऱ्या अर्थाने दिपवून टाकले आहेत. या एक्स मधून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशयोजनेमुळे ट्विटर मुख्यालयाच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना अतिशय त्रास होतो आहे. अनेक स्थानिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक व्यावसायिक कंपन्यांनी आपली कार्यालये सॅन फ्रान्सिस्को शहराबाहेर नेली आहेत. पण एलन मात्र हे शहर सोडण्यास अजिबात तयार नाही. एलन यावर सांगतात, मी कधीही सॅन फ्रान्सिस्को सोडणार नाही. इतर व्यावसायिकांनी जरी हे शहर सोडले असले तरी मी नेहमीच या शहराचा मित्र राहीन.
स्थानिक मात्र एलनवर अतिशय नाराज आहेत. एकाने ट्विटरवर व्हिडिओ टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, मला माझ्या शहरात राहायला आवडते. या शहरातील प्रत्येक गोष्ट मला आवडते. रस्त्यावरील दिवे, सायरन, गर्दी सारे आवडते. पण एक्स च्या दिव्यांच्या त्रासाची गोष्टच वेगळी आहे.