महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । देशात जुलैअखेर सरासरीपेक्षा फक्त ५ तर राज्यात १३ टक्के पाऊस अधिक झाला आहे. उत्तर भारतात अतिपर्जन्यामुळे शेतीचे नुकसान झाले असून राज्यातील मैदानी भागांत पाऊस उशिरा आल्याने तसेच डझनभर जिल्ह्यांत अद्याप त्याने सरासरीही न गाठल्याने खरीप पेरण्यांना फटका बसला आहे. राज्यात जुलैअखेर ८ टक्के कमी म्हणजे ९२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही तूर, उडीद, मूग, गहू, भुईमूग, सूर्यफुलाचे क्षेत्र कमी असल्याने रवा, गहू, शेंगदाणे, डाळी व तेलाच्या महागाईला भविष्यात सामाेरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. तर जास्त क्षेत्रामुळे साेयाबीन व कपाशीचे दर घसरण्याची चिन्हे अाहेत.
किराणा दरात आणखी वाढीची चिन्हे
सध्या तूरदाळ, गहू, रवा, शेंगदाणे दरात वाढ झाली आहे. भुईमुगासह कडधान्य लागवड पुरेशी नसल्याने डाळींसह शेंगदाणे, तेल दरात वाढीची चिन्हे आहेत. – सुरेश शेटे, घाऊक किराणा विक्रेते, नाशिक रोड
पावसाने ओढ दिल्यास नुकसान
जूनमध्ये पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, कापूस आणि तुरीला पसंती दिली आहे. आगामी काळात पावसामध्ये खंड पडल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. – मोहन वाघ, कृषी सहसंचालक