वर्षाविहार ; पावसाळी पर्यटनावर बंदी; अन्यथा दोन वर्षाची शिक्षा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- मुंबई – लक्ष्मण रोकडे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून घरांत बंद असलेल्या नागरिकांना लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे पावसाळी पर्यटनाचे वेध लागले होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावाचा धोका आणि पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४२हून अधिक पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशांनुसार धबधबे, तलाव आणि धरणांच्या सभोवतालचे सुमारे एक किमी क्षेत्र पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागांत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले.

बदलापूरच्या कोंडेश्वर परिसरात पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्यांचे बुडून मृत्यू, माळशेज, कसारा, पारसिक डोंगरावरील दरड कोसळणे… अशा घटनांमुळे ठाण्यातील पर्यटनस्थळे पावसाळ्यात पर्यटकांसाठी धोकादायक ठरू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळी पर्यटनस्थळे प्रतिबंधित करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा प्रशासनाकडून घेतला जातो. परंतु यंदा करोना प्रादुर्भावाचा धोका असल्याने हा कार्यकाळ अनिश्चित काळासाठी अर्थात पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. त्यामुळे यंदाचा पावसाळा पर्यटकांसाठी बंदीमध्येच जाण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि पोलिसांची नजर चुकवून अशा ठिकाणी दाखल होणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असून अशा अतिउत्साही मंडळींवरचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना एक ते दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. तसेच करोना प्रतिबंधात्मक कायद्यानुसारही कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

माळशेज घाटासह या स्थळांवर निर्बंध …

ठाणे परिसरातील येऊरचे धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपास येथील धबधबे, गायमुख, घोडबंदर, उत्तन किनारा, कल्याण परिसरातील कांबा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट चौपाटी, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, पडाळे डॅम, माळशेज घाटातील धबधबे, पळू, खोपवली गोरखगड, सिंगापूर नाणेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे, भिवंडी तालुक्यातील नदी किनारा, गणेशपुरी नदी परिसर, शहापूर तालुक्यातील भातसा धरण, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोंळखांब), सापगांव नदी किनारा, कळंबे नदी किनारा बंद राहणार आहे.तर अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी या पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू राहणार आहेत.

अस्वच्छता आणि असभ्यांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणे, टिंगल, टवाळी, असभ्य वर्तन, अश्लिल हवभाव, शेरेबाजी, लज्जा उत्पन्न होईल अशा कृत्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. तर खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या व थर्माकोलचे साहित्य उघड्यावर फेकणे. मोठ्या आवाजात स्पीकर, डीजे, लाऊडस्पीकर, संगीत यंत्रणा, गाडीमधील स्पीकर्स वाजवण्यास बंदी असून ध्वनिप्रदूषण केल्यास त्यानुसारही गुन्हा दाखल होणार आहे. ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण करण्यास बंदी राहणार आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांवर पोलिस आणि प्रशासनाकडून धडक कारवाई केली जाणार आहे. धबधब्यांच्या एक किमी परिसरात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी अशा कोणत्याही प्रकारचे वाहने नेता येणार नाही. अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना मात्र हा नियम लागू राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *