15 नव्हे 14 ऑक्टोबरला संग्राम ; हिंदुस्थान- पाकिस्तान सामन्याच्या तारखेत बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । घटस्थापनेला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात होणारे क्रिकेटयुद्ध आता 15 नव्हे तर 14 ऑक्टोबरला होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नवरात्रीत होणारा क्रिकेटच्या वैऱयांमधला धमाका नवरात्रीच्या पूर्वसंध्येला अहमदाबादच्याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तसेच पाकिस्तानला या महामुकाबल्याची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्यांचा श्रीलंकेविरुद्ध 12 ऑक्टोबरला हैदराबादला होणारा सामना आता 10 ऑक्टोबरला खेळविला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या दोन्ही सामन्यांच्या तारखेतील बदलांना संमती दिल्यामुळे बीसीसीआयसमोर असलेली अडचण दूर झाली आहे. आता लवकरच आयसीसी वर्ल्ड कपचा सुधारित कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर करेल.

क्रिकेटच्या महायुद्धाच्या तारखेत झालेल्या बदलामुळे बीसीसीआयची एक अडचण दूर झाली असली तरी त्यांना अनेक अडथळय़ांची शर्यत अजूनही पार करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थान-पाकिस्तान सामना एक दिवस आधी खेळविला जाणार असल्यामुळे हिंदुस्थानच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना फार मोठा मनःस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दर शनिवारी दोन-दोन सामने खेळविले जाणार आहेत. त्यापैकी एक सामना दिवसा तर एक सामना दिवस-रात्री खेळविला जाणार आहे. मात्र आता रविवार, 15 ऑक्टोबरला खेळविला जाणारा सामना शनिवार, 14 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला 2 नव्हे तर 3 सामने खेळविले जाणार आहेत. 14 ऑक्टोबरला चेन्नई येथे न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दिवसा सामना खेळविला जाणार आहे तर दिल्ली येथे इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात दिवसरात्र सामना रंगणार होता. आता हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील लढतही दिवसरात्र होणार असल्यामुळे एकाच दिवशी तीन-तीन सामने खेळविले जाणार आहेत. एकाच दिवशी तीन सामने होणार असल्यामुळे ब्रॉडकास्टर टीमला थेट प्रक्षेपणासाठी काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

15 ऑक्टोबरला आता काय ?

15 ऑक्टोबरला हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार होता. आता तो सामना 14 ऑक्टोबरला खेळविला जाणार आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरच्या रविवारी सामना होणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती बीसीसीआय किंवा आयसीसीकडून कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे 15 ऑक्टोबरला काय ? हा प्रश्न कायम आहे.

सामन्याच्या तारखेतील

बदलाचा फटका बसणार

जगभरातील क्रिकेटप्रेमींना आपल्या अहमदाबादला येण्याच्या आणि जाण्याच्या विमान तिकिटात बदल करावा लागणार. त्यामुळे त्यांना फार मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच त्यांना आपल्या हॉटेल्सचे बुकिंगही बदलावे लागणार आहे.

एकाच दिवशी तीन-तीन सामन्यांचे थेट प्रक्षेपण करताना टीव्ही ब्रॉडकास्टरची दमछाक होणार आहे. त्यांनी एकाच दिवशी दोन सामने थेट प्रक्षेपित करण्याची व्यवस्था केली आहे. आता त्यांना एका दिवसासाठी का होईना तिसऱया सामन्याचीही तयारी करावी लागणार आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीसाठी रविवारचा दिवस असल्यामुळे या सामन्याचे सर्वांनीच इव्हेंट केले होते. त्या सामन्याची विशेष तयारी करण्यात आली होती, मात्र आता त्यांचे प्लॅनिंग पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. एकाच दिवशी तीन सामने होणार असल्यामुळे 14 ऑक्टोबरला होणाऱया दुसऱया दिवसरात्र सामन्याच्या उत्पन्नावर तसेच तिकीट विक्रीवर खूप मोठा फरक पडणार, हे जवळजवळ निश्चित आहे.

एकाच वेळेला दोन-दोन सामने असल्यामुळे जाहिरातींवर आणि प्रेक्षकांच्या संख्येवरही फार मोठा परिणाम पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *