Tesla ; भारतातील पहिले कार्यालय पुण्यात विमाननगरमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । जगातील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या Tesla (टेस्ला) कंपनीच्या भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. याचवेळी टेस्लाने देशातील पहिले कार्यालय पुण्यातील विमाननगरमध्ये भाडेतत्वावर घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे Tesla टेस्लाकडून गुंतवणुकीसाठी पुण्याची निवड होऊ शकते, असा कयास वर्तविला जात आहे.

टेस्लाची भारतातील उपकंपनी Tesla (टेस्ला) इंडिया मोटार अँड एनर्जीने विमाननगरमधील पंचशील बिझनेस पार्कमध्ये ५ हजार ८५० चौरस फुटांचे कार्यालय भाडेतत्वावर घेतले आहे. या कार्यालयाचे दरमहा मासिक भाडे ११.६५ लाख रुपये आहे. पहिल्या मजल्यावर हे कार्यालय असून, ते ३६ महिन्यांसाठी म्हणजेच ३ वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आले आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीजकडून हे कार्यालय भाड्याने घेण्यात आले असून, त्याचे भाडे दरवर्षी ५ टक्क्याने वाढणार आहे. या कार्यालयाचे भाडे १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. Tesla (टेस्ला) कंपनी मुंबईत कार्यालय सुरू करणार अशी चर्चा सुरू होती. परंतु, त्याऐवजी कंपनीने आता पुण्याला पसंती दिल्याचे दिसत आहे.

टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भारतात प्रवेश करण्यासाठी कंपनी इच्छुक असून, त्यादृष्टीने कंपनीच्या अधिकाऱ्यांची सरकारसोबत चर्चाही सुरू आहे. देशात इलेक्ट्रिक मोटार उत्पादन निर्मिती प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा टेस्लाचा विचार आहे. सरकारने इलेक्ट्रिक मोटारींवरील आयात शुल्क कमी करावे, अशी मस्क यांची मागणी आहे. हा निर्णय झाल्यास टेस्लाच्या मोटारी भारतात आयात होऊन त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढू शकते.


भारतात २०२१ मध्येच नोंदणी
टेस्लाची भारतातील उपकंपनी टेस्ला इंडियाने बंगळुरूमध्ये २०२१ च्या सुरूवातीला नोंदणी केली. कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांनी २०१९ मध्येच भारतात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली होती. परंतु, त्यानंतर पुढे काही हालचाली झाल्या नव्हत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *