मेट्रोला पुणेकरांची पसंती! विस्तारित सेवेला पहिल्या दोन दिवसांत मोठा प्रतिसाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । पुणे मेट्रोची विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय या मार्गाच्या दुप्पट प्रवासी संख्या वनाझ ते रुबी हॉल या मार्गावर पहिल्या दोन दिवसांत दिसून आली. मेट्रोने मंगळवारी (ता.१) सुमारे १३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत प्रवासी संख्या २७ हजार ७७२ झाली.

मेट्रोची विस्तारित सेवा मंगळवारी सुरू झाली. वनाझ ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग आता सुरू झाला आहे. आधी या मार्गावर वनाझ ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. आता गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. आता हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला आहे.

मेट्रोची विस्तारित सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सुरू झाली. ही सेवा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती. या कालावधीत एकूण १२ हजार ९१८ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात वनाझ ते रुबी हॉलदरम्यान ७ हजार ४५६ प्रवासी आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालयदरम्यान ५ हजार ४६२ प्रवासी होते. प्रवाशांनी बुधवारी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत २७ हजार ७७२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात वनाझ ते रुबी हॉल १७ हजार ९१७ आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय ९ हजार ८५५ अशी प्रवासी संख्या होती.

मेट्रो प्रवाशांसाठी पीएमपीची फीडर सेवा जिल्हा न्यायालय स्थानकातून सुरू करण्यात आली आहे. याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्रप्रताप सिंह यांची आज बैठक झाली. त्यानुसार इतरही स्थानकांवरून फीडर सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.- हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

मेट्रोची सर्वाधिक प्रवासी संख्या (बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
रुबी हॉल : ३१०२

शिवाजीनगर : २५६४

जिल्हा न्यायालय : २४०७

वनाझ : २२८८

पिंपरी-चिंचवड महापालिका : १९८८

मेट्रो सेवा सकाळी ७ ते रात्री १०

दर १० ते १५ मिनिटांनी गाडी

प्रत्येक स्थानकावर ३० सेकंद थांबा

मेट्रोचा तिकीट दर १० पासून ३५ रुपयांपर्यंत

तिकीट खिडकीसह ऑनलाइनही तिकीट

विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत

शनिवार, रविवार सर्वाना ३० टक्के सवलत

मेट्रो कार्डधारकांना १० टक्के सवलत

वनाझ ते रुबी हॉल अंतर ३० मिनिटांत

पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय अंतर २५ मिनिटांत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *