![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच या अंदाजानुसार परिस्थिती दिसुन येत आहे. कोकण आणि विदर्भातील काही भाग वगळला असता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. तर काही भाग पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील काही भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागातील वातावरण ढगाळ असेल तर, पावसाच्या तुरळक सरी अधुनमधून बरसणार आहेत. तर नवी मुंबईत पाऊस काहीसा जोर धरेल पण, पश्चिम उपनगरांमध्येही हलक्या सरींची शक्यता आहे. पण, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही पावसाचा जोर ओसरला आहे. तर आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
आज राज्यातील 6-7 जिल्ह्यांनाच यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात पुणे आणि मुंबईचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सातारा सात ठिकाणीच आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी पावसाचा जोर आणखीच कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे.
