महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सत्ताधारी, विरोधक आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडतील. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली जाईल, तसंच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केली नाही. यावरुन देखील विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर वाढत्या महागाईसह विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरतील. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधपक्षातील प्रमुख नेत्यांची भाषणं आज होतील, त्याचबरोबर प्रस्ताव मांडला जाईल, राज्याचा सुरू असलेला कारभार, अधिवेशनात घेण्यात आलेले निर्णय यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपला अभिप्राय मांडत सत्ताधारी व विरोधकाच्या चहापानाने आज पावसाळी अधिवेशाचा शेवट होईल.
आतापर्यंत चर्चेला आलेले विषय
पावसाळी अधिवेशनामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न, समृद्धी महामार्गावर झालेले अपघात, पावसाने झालेले नुकसान, पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर आलेले दुबार पेरणची संकट, शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, तसेच राज्यात जातीय आणि धार्मिक हिंसाचाराच्या घटना, राज्यातील फोडाफोडीचे राजकारण हे विषय आतापर्यंत चर्चेला आलेले आहेत.
