नितीन देसाईंनी गळफास घेण्याआधी जमिनीवर धनुष्यबाण का काढला? व्हॉईस रेकॉर्डिंगमधून गूढ उकललं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 4 ऑगस्ट । सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंनी कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओत गळफास घेतला. देसाईंच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या तरुणानं धक्कादायक माहिती दिली आहे. देसाईंनी गळफास घेण्यापूर्वी जमिनीवर दोरीनं एक धनुष्यबाण तयार केला होता. त्या धनुष्याच्या मध्यभागी राहून त्यांनी आयुष्याला पूर्णविराम दिला. देसाईंनी उभारलेल्या स्टुडिओमध्ये आसपासच्या अनेक तरुणांना रोजगार मिळाला. त्यातील काही जण देसाईंच्या अतिशय जवळचे होते. त्यामुळे देसाईंच्या आत्महत्येबद्दल कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

देसाईंनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी पोहोचलेल्या एका तरुणानं दिलेल्या माहितीनुसार, देसाईंनी स्टुडिओतील एका सेटवर जाऊन गळफास घेतला. त्याआधी त्यांनी जमिनीवर दोरीनं एक धनुष्यबाण काढला होता. देसाईंनी असा धनुष्यबाण का काढला असा प्रश्न अनेकांना पडला. याचं उत्तर त्यांनीच केलेल्या व्हॉईस रेकॉर्डिंगमधून मिळालं आहे. एन डी स्टुडिओचं शिवधनुष्य उचललं. पण ते खाली ठेवण्याची वेळ आता आली आहे, असं देसाईंनी व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं आहे. मी संकटातून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पडू शकलो नाही. त्यामुळे आता थांबायची वेळ आली आहे, असा उल्लेख रेकॉर्डिंगमध्ये आहे.

स्टुडिओजवळ असलेल्या गावचा रहिवासी असलेल्या मयूर नावाच्या तरुणानं देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली. गेल्या ५ ते १० वर्षांपासून माझं एन डी स्टुडिओत येणं जाणं होतं. माझे वडील आणि चुलते स्टुडिओतील व्यवस्थापन पाहायचे. नितीन दादांशी आमचे चांगले संबंध होते. आमच्या गावातला एक मुलगा दादांच्या अगदी जवळचा होता. दादांनी त्याला २ ऑगस्टला सकाळी साडे आठ वाजता ऑफिसला बोलावलं होतं. माझ्या ऑफिसला ये. तिथे तुला एक रेकॉर्डर मिळेल. त्यात सगळं काही आहे. ते तू ओपन करुन ऐक, असं दादा त्याला म्हणाले होते. त्यानुसार तो मुलगा दादांच्या कार्यालयात गेला. तिथे त्याला रेकॉर्डर मिळाला. त्यात त्यांनी आपण कोणत्या सेटअपवर आहोत ते सांगितलं होतं. त्यानुसार तो मुलगा तिथे गेला. तिथे त्यानं दादांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. त्यानंतर त्यानं आम्हाला फोन केला. आम्ही तिथे पोहोचून पोलिसांना माहिती दिली, असा घटनाक्रम मयूरनं कथन केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *