धक्कादायक; पुणे महापालिकेच्या 112 कर्मचाऱ्यांना कोरोना,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – : दि.२१ – पुणे शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पुणे महापालिकेच्या 112 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 46 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 61 कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या जुलै अखेर 18 हजारांवर जाऊ शकते, अशी भीती आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील ज्या भागांमध्ये यापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, तेथेही आता कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरीलही ताण वाढला आहे. त्यामुळे लक्षणं नसलेल्या रुग्णांवर यापुढे घरीच उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णांकडून घरातच राहण्याचं हमीपत्रही घेण्यात येणार आहे. अशा रूग्णांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार देण्यात येतील. या निर्णयामुळे पालिका आरोग्य यंत्रणेवरील 25 टक्के ताण कमी होणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 14 हजार 181 पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 560 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

एकीकडे पालिकेने लक्षणं नसलेल्या रूग्णांवर यापुढे घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला असला तरीही दाट वस्तीमधील रूग्णांना मात्र कोविड सेंटरमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘को मॉर्बिड’ रूग्णांवरही हॉस्पिटलमधेच उपचार होईल. याबाबत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी, एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 50% आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3827 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1935 रुग्ण निरोगी झाले. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 24 हजार 331 झाली आहे. तर, 62 हजार 773 रुग्ण निरोगी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *