महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ ऑगस्ट । राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या आगेमागे हा मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होईल. त्यामध्ये ६ भाजपला, ४ शिंदेसेनेला आणि ४ राष्ट्रवादीला मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ४ विद्यमान आमदार अजित पवार गटासोबत येणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. गेल्या वर्षी सत्ता स्थापन केल्यावर शिंदे आणि फडणवीस हेच मंत्री होते. महिनाभरानंतर पहिला विस्तार झाला. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यावर दुसरा विस्तार झाला होता.
राज्याचे ३३ विभाग असून राज्य मंत्रिमंडळात ४३ मंत्री होऊ शकतात. सध्या मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा आकडा २९ आहे. अद्याप १४ मंत्रिपदे रिक्त आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात १० मंत्र्यांना सामील केले जाणार आहे. त्यामध्ये ६ मंत्रिपदे १०५ आमदार संख्या असलेल्या भाजपला, ५३ आमदार असलेल्या राष्ट्रवादीला ४ आणि ४० आमदार संख्येच्या शिवसेनेला ४ मंत्रिपदे मिळणार आहेत. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता शरद पवार यांची साथ सोडणार आहे. या नेत्यासोबत राष्ट्रवादीचे जालना, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे तीन आमदार असतील. शरद पवार गटाचे हे चार आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर प्रवेश करतील. मंत्रिमंडळ विस्तारात यातील एका बड्या नेत्यास कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. आश्चर्य म्हणजे जलसंपदा मंत्रिपद हवे, अशी अट या मंत्र्याने घातली असून ती मान्य झाल्याचे सांगण्यात येते.
पालकमंत्रीपदाची घोषणा विरली
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. शिंदेसेनेचे आमदार भरत गोगावले आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तशी तयारीही केली होती. प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. त्यानंतर अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजे ४ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांची घोषणा होणारच, असा दावा केला जात होता. तोही फोल ठरला आहे. त्यामुळे आता १५ ऑगस्टच्या आसपास तिसऱ्या विस्ताराचा मुहूर्त कितपत ठरेल, या विषयी मंत्री पदासाठी इच्छुक साशंक आहेत.
भाजप सहा, शिंदेसेना ४, अजितदादा गटाला ४ जागा
२० जागांच्या अंदाजाने धास्ती
एकनाथ शिंदे यांच्यासाेबत भाजपने सरकार स्थापनेचा केलेला प्रयोग अयशस्वी ठरतो आहे. त्याची नकारात्मक लाट राज्यात आहे. त्याचा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुरस्कृत एनडीए आघाडीला बसू शकतो. म्हणूनच राष्ट्रवादीला सरकारात सामील केले. त्यानंतर भाजप संबंधित संस्थेने केलेल्या नमुना पाहणीत फक्त २० जागा एनडीएला मिळतील, असे स्पष्ट झाले. त्याची धास्ती घेऊन महायुतीत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उर्वरित आमदारही सरकारबरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
खाते बदलण्याची शक्यता
सध्या अस्तित्वात असलेल्या मंत्रिमंडळातील शिंदेसेनेच्या आणि भाजपच्या काही मंत्र्यांची खाते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी सांगितले की, केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, असा भाजपच्या काही दिल्लीश्वर नेत्यांचा आग्रह आहे. परफॉर्मन्स हा मुद्दा प्रचारात महत्वाचा ठरू शकतो, हे लक्षात घेऊन खाते बदलली जावीत. तशी तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली. ती कितपत प्रत्यक्षात येते, याचे उत्तर लवकरच मिळेल