IND vs AUS: वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का ! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे जायबंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ ऑगस्ट । India vs Australia: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी२० मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची दुखापत गंभीर असू शकते. अ‍ॅशेस मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी कमिन्सला ही दुखापत झाली होती. कमिन्सच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असून त्याला बॅट धरताना त्रास होत आहे. एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त दोन महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत कमिन्सची दुखापत गंभीर राहिल्यास ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या संकटात सापडू शकतो.

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. गेल्या दोन महिन्यांत त्याने एकूण सहा कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेचा समावेश आहे. कमिन्सने या सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले, एक ड्रॉ राहिला आणि दोन सामन्यांमध्ये त्याला पराभूत व्हावे लागले.

दोन महिने सतत अ‍ॅक्शनमध्ये राहिल्यानंतर कमिन्सला विश्रांतीची गरज होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र दुखापतीमुळे कमिन्स सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या वन डे मालिकेतूनही बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी ही चिंतेची बाब आहे.

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात पॅट कमिन्सला पहिल्याच दिवशी डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. यानंतर त्याने मनगटावर पट्टी बांधून तो संपूर्ण सामना खेळला. या दुखापतीचा त्याच्या गोलंदाजीवर परिणाम झाला नाही, मात्र फलंदाजीदरम्यान त्याला खूप त्रास होत होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या जवळच्या दोन सूत्रांनी स्थानिक वृत्तपत्राला सांगितले की, “वैद्यकीय पथकाला अजूनही कमिन्सच्या मनगटात फ्रॅक्चर असल्याचा संशय आहे. असे झाल्यास ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत येईल, कारण एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यास अवघे दोन महिने शिल्लक आहेत.”

क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढील आठवड्यात वन डे आणि टी२० संघाची घोषणा करू शकते. ऑस्ट्रेलियाला ३० ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी२० आणि पाच एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर २२ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियन संघ भारतात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत जरी स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियन संघाची धुरा सांभाळली असली तरी दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या मालिकेत मिचेल मार्शला कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅरोन फिंचच्या निवृत्तीनंतर मार्श ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघाचा नियमित कर्णधारही होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *