महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) असून त्यांनी विधीमंडळात गटनेते म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळं जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आदेश महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपल्याकडं वळविणे ही व्यूहरचना असू शकते, असं मत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केलं.
अॅड. निकम (Ujjwal Nikam) म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधिमंडळात फूट पडली आहे. त्यामुळं त्यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. विधीमंडळात अधिकृत प्रतोद नियुक्त करण्याचा अधिकार राजकीय पक्षाच्या प्रमुखाला असतो. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार हा अधिकार त्या पक्षाच्या अध्यक्षाला असतो.
राजकीय सत्तासंघर्षाच्या निकालातही ही बाब सर्वोच्च न्यायालयानं उघड केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकृत पक्ष, ज्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडं नोंदणी झाली आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांनी अधिकृतरीत्या गटनेते म्हणून जयंत पाटलांची निवड केली आहे.
पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार हा पक्षाच्या निवडलेल्या प्रतोदला आहे. त्यामुळं जयंत पाटलांचा आदेश किंवा व्हीप हा महत्त्वाचा आहे. पक्षाचा व्हीप जयंत पाटील यांचाच लागू होणार आहे. त्यामुळं एखाद्याला आपल्याकडं वळविणे ही राजकीय पक्षाची व्यूहरचना असू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रतोदाला कारवाईचे अधिकार
विधीमंडळात जो राजकीय पक्षाने काढलेल्या आदेशाचा भंग झाला असेल, तर त्यावर पक्षाच्या प्रतोदाला कारवाई करता येते. उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांची मैत्री पूर्वीच्या राजकीय पक्षात जरी असली, तरी जयंत पाटील यांनी जो आदेश दिला आणि त्यांचा भंग केला असेल, तर त्यावर कारवाई होवू शकते. परंतु, आज त्यावर भाकीत करणे कठीण आहे, असे मतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.