महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । कोरोना महामारीतून जग सावरत असतानाच, पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या सब व्हेरियंटने आता धुमाकूळ घातला आहे. मात्र, पुण्यात मे महिन्यातच याचा एक रुग्ण आढळला होता असं समोर आलं आहे.
जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्राचे समन्वयक आणि बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी TOI शी बोलताना याबाबत माहिती दिली. “महाराष्ट्रात मे महिन्यात EG.5.1 आढळून आला होता. त्याचे निदान होऊन दोन महिने उलटून गेले आहेत आणि त्यात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. जून आणि जुलैमध्ये राज्यात या सबव्हेरियंटचा प्रभाव वाढलेला दिसला नाही. तर, राज्यात सध्या XBB.1.16 आणि XBB.2.3 या व्हेरियंटचा प्रभाव अधिक दिसत आहे.” असं ते म्हणाले.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जुलै अखेरीस सक्रिय कोविड-19 रुग्णांची संख्या 70 वरून 6 ऑगस्ट रोजी 115 वर पोहोचली. सोमवारी राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 एवढी होती.
EG.5.1मुळे अलीकडेच युनायटेड किंगडममध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यूकेमध्ये EG.5.1 सबव्हेरियंटचा वेगवान प्रसार होत आहे, या नवीन कोरोना व्हेरियंटला एरिस (ERIS) असं नाव देण्यात आलं आहे. 31 जुलै रोजी याला अधिकृतपणे ओळखले गेले, या उपप्रकारामुळे संक्रमण वाढल्याचं दिसून येत आह. मुंबईत सध्या 43 सक्रिय कोविड-19 रुग्ण आहेत, तर पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या 34 इतकी आहे.
E G.5.1 हा Omicron XBB.1.9 चा प्रकार आहे, जो आतापर्यंत भारतातील रुग्ण संख्येवर प्रभाव पाडू शकला नाही, डॉ. कार्यकर्ते म्हणाले. “सध्या रुग्णालयात दाखल होण्यावर रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवणे शहाणपणाचे ठरेल.” राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक सक्रिय कोविड रुग्णसंख्या मुंबईत (43) आहे. त्यानंतर पुणे (34) आणि ठाण्याचा (25) क्रमांक लागतो. तर रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये सध्या प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे.
राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही याला प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे असं लगेच म्हणू शकत नाही. निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आठवडाभर परिस्थितीचे निरीक्षण करावे लागेल. त्यामुळे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत कोविडमध्ये थोडीशी वाढ झालेली दिसत आहे.”
पुण्यातील नोबल हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, “गेल्या १५ दिवसांपासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आपण पाहत आहोत. अलीकडेच रुग्णालयात एक कोविड मृत्यूची नोंद झाली आहे. आम्ही गेल्या 15 दिवसांत 10 हून अधिक कोविड प्रकरणे पाहिली आहेत आणि बहुतेक सौम्य होती. तीन रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाले. ते एकतर वृद्ध होते किंवा त्यांना गंभीर आजार होते.”
“आम्ही फ्लू सारखी लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये वाढ पाहत आहोत. त्यापैकी बहुतेक रुग्णांना राइनोव्हायरस, इन्फ्लूएंझा, H1N1, H3N2 आणि कोविड सारख्या विषाणूंची लागण झाल्याचं दिसून येत आहे.”, असंही ते म्हणाले.
केईएम रुग्णालयाचे वरिष्ठ उप-वैद्यकीय प्रशासक डॉ. मधुर राव म्हणाले, “गेल्या आठवडाभरात रुग्णालयात कोविड-19 चे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना इतर कारणांसाठी दाखल करण्यात आले होते, जसे की डेंग्यूची लक्षणे दर्शविणारी आणि त्यांच्या चाचण्यांमध्येही डेंग्यूच्या संसर्गाची लक्षणे समोर आली. या प्रकरणांमध्ये, दोन मुले आहेत, त्यापैकी एक सध्या बालरोग अतिदक्षता विभागात (PICU) आणि व्हेंटिलेटरवर आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”