वीजबिलाबाबतचा एक मेसेज करू शकतो तुमचाही घात, महावितरणने केलं महत्त्वाचं आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । गेल्या महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. या मेसेजने ग्राहकांमध्ये चांगलेच संभ्रमाचे वातावरण आहे.

या संदेशांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्यास मोबाइल किवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *