महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ शरद पवार यांचीच चलती असल्याचा प्रत्येय पुन्हा एकदा आला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारविरोधात सादर करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानावेळी अजित पवार गटाची लोकसभेतील ताकद उघडी पडली. त्यांच्यातर्फे सुनील तटकरे सरकारच्या बाजूने सभागृहात एकटेच बसल्याचे दिसून आले. तर एनसीपीच्या उर्वरित खासदारांनी विरोधकांसोबत सभात्याग केला. यामुळे राष्ट्रवादीत केवळ शरद पवारांचीच पॉवर सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे.
विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव गुरुवारी आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. तत्पूर्वी, या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मोहम्मद फैजल यांनी व्हीप जारी केला होता. तर अजित पवारांच्या गटातर्फे सुनील तटकरे यांनी व्हीप बजावला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार कोणत्या गटाकडे आहेत? याविषयी उत्सुकता लागली होती.
कुणाकडे किती खासदार?
सभागृहातील प्रत्यक्ष मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. पण सुनील तटकरे जागीच बसल्याचे दिसून आले. यामुळे संसदेच्या राजकारणात तटकरे हे एकमेव खासदार अजित पवार गटाकडून असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा सभागृहात बसलेला एक फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगणाऱ्या अजित पवार गटावर चांगलीच नामुष्की ओढावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गत महिन्यात झाली होती बंडखोरी
उल्लेखनीय बाब म्हणजे, गत महिन्यात राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्यासह 8 बड्या नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यानंतर अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे संपूर्ण पक्षावर दावा केला होता.
आता लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष
आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत असल्याची मान्यता देतात यावर सर्व अवलंबून आहे. तूर्त सध्या हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे.