सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुण्यातून जाणार्‍या एसटीच्या गाड्यांना प्रचंड गर्दी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । भुसावळ विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे बहुतांश रेल्वे गाड्या रद्द आहेत. त्यासोबतच सलग सुट्या मिळाल्यामुळे अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवारी (दि. 12) पुण्यातून जाणार्‍या एसटी गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्टँड येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरकारी नोकरदारांना आणि चाकरमान्यांना मिळालेल्या सलग सुट्यांमुळे अनेक प्रवासी आपल्या कुटुंबीयांसमवेत एसटी स्थानकावर आले होते. स्थानक परिसरासह एसटीच्या गाड्यादेखील या वेळी तुडूंब भरून जाताना पाहायला मिळाल्या.

स्वारगेटला आरक्षण खिडकीवर रांगा
स्वारगेट स्थानकावरील मुख्य फलाट, सोलापूर फलाट, सातारा,कोल्हापूर बारामती फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तसेच, आरक्षण खिडक्यांवरसुध्दा प्रवाशांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे दिसले.

गर्दीमुळे कडक बंदोबस्त
प्रवाशांना वेळेत गाड्या मिळाव्यात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता एसटी प्रशासनाने काळजी घेतल्याचे दिसून आले. स्वारगेट स्थानकावर शनिवारी नेहमीपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *