पुणे चांदणी चौक पुलाचे उद्घाटन झाले, परंतु सर्वसामान्यांसाठी पूल सुरु केला नाही, काय आहे कारण?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसराची समस्या संपण्याची चिन्ह नाही. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला होता. त्यामुळे या पुलाचे काम विक्रमी वेळेत करण्यात आले. पुलासाठी ८६५ कोटी रुपये खर्च झाला. त्यानंतर शनिवारी १२ ऑगस्ट रोजी चांदणी चौक उड्डणपुलाचे लोकर्पण केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. या समारंभानंतर हा पूल सुरु होण्याची अपेक्षा होती. परंतु दोन दिवसानंतरही पूल सर्वसामान्यांसाठी खुला झाला नाही.


का सुरु झाला नाही पूल
चांदणी चौक उड्डाणपुलाचे शनिवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन झाले. कार्यक्रमानंतर पूल सुरू होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे अनेकजण वाहने घेऊन या पुलाकडे गेले. परंतु मुळशीकडे जाणारा मंडप काढला गेला नाही. यामुळे वाहनधारकांना पुलावरुन जाता आले नाही. रविवारी अनेक वाहन धारकांची निराशा झाली. सोमवारी सकाळी मंडप त्याच ठिकाणी होता. यामुळे पूल सुरू होण्यासाठी आता मंगळवार उजाडण्याची शक्यता आहे.

दोन दिवस का ठेवला मंडप
चांदणी चौक पुलाचे काम युद्धपातळीवर झाले. कामाचे कौतूक उद्घाटन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केले. परंतु उद्घाटनानंतर प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. पुलावरील मंडप तातडीने काढून पूल सुरु करण्याची अपेक्षा होती. परंतु दोन दिवस झाले तरी पूल सुरु करण्यात आलेला नाही. यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

कसा आहे चांदणी चौक पूल
चांदणी चौकातील जुना पूल १९९२ मध्ये केला होता. परंतु त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली होती. यामुळे पुढील ५० वर्षांचा विचार करुन चांदणी चौकात नवीन पुलाची उभारणी केली गेली आहे. या ठिकाणावरुन दिवसाला दीड लाख वाहने जाऊ शकणार आहे. त्यासाठी मुंबईवरुन साताऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी तीन लेन तर साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर तीन लेन केल्या गेल्या आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सेवा रस्ते केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *