पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट; पवार काका पुतणे यांच्या ‘त्या’ भेटीत काय घडलं?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे. अजित पवार यांच्या गटाला भाजपने आपल्यासोबत घेतले. अजित पवार आल्यानंतर शरद पवारही आपल्यासोबत येतील असं भाजपला वाटत होतं. पण शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता भाजपने पुढचा डाव टाकला आहे. भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून या दोन ऑफर्स देण्यात आल्या आहेत. भाजपच्या या खेळीमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या शरद पवार यांच्यासोबत ज्या भेटीगाठी वाढल्या आहेत, त्यामागे या ऑफर्सवरील चर्चा असल्याचंही सांगितलं जात आहे.


माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला आहे. तसं वृत्तच फ्रि प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते, असं सांगण्यात आलं.

संवाद कायम, तिसरी भेट
अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केलं. त्यानंतरही अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी संवाद कायम ठेवला आहे. शनिवारी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. ही तिसरी भेट होती. ही भेट संवाद सुरू असल्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे.

सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनाही ऑफर
पृथ्वीराज चव्हाण यांनी या ऑफरवर आणखी माहिती दिली आहे. जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. अजितदादा हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजितदादांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितलं असल्याचं समजतं.

भाजपने आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडली. भाजपला आता शरद पवार यांनाही आपल्यासोबत घ्यायचं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळावं म्हणून भाजपची ही खेळी असल्याचं सांगितलं जात आहे.

पवारांनीच ठरवावं
शरद पवार आणि अजितदादा यांच्यातील भेटीवरून शिवसेनेत नाराजी आहे. काँग्रेसलाही या भेटी मंजूर आहेत काय? असा सवाल चव्हाण यांना करण्यात आला. त्यावर, या बैठकींची किती गरज आहे, याचा निर्णय शरद पवार यांनीच घ्यायचा आहे, असं चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *