महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांची दीड वर्षानंतर (17 महिन्यांनंतर) सुटका करण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2 महिन्यांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर नवाब मलिक क्रिटीकेअर रुग्णालयातून बाहेर आले. या वेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
खुल्या जीपमधून नबाव मलिक यांची रॅली काढण्यात आली. त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मलिक, संजय राऊत यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई झाली ती वाईट होती. मी पक्ष म्हणून या ठिकाणी आलेले नाही. ते माझे मोठे भाऊ आहेत. आता कोर्टाने न्याय दिला आहे. त्यामुळे सत्याचा विजय झाला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.