![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । जुन्नर तालुका हद्दीत नगर कल्याण महामार्गावर मढ,करंजाळे,खुबी,माळशेज घाट या परीसरात मंगळवारी दोन विविध ठिकाणी ट्रक पलटी झाल्याने वाहतुक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लाब रांगाच्या रांगा लागल्या होत्या. ओतूर पोलीसांच्या दहा कर्मचाऱ्यांच्या पथकानी सदर ठिकाणी जाऊन वाहतुक सुरळी केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी कल्याण वरून नगरच्या दिशेने येणाऱ्या माल वाहतूक करणारा ट्रक मढ जवळील खिंडीमध्ये रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे साईड पट्टीवर गेला आणि साईड पट्टीचा भराव खचला व ट्रक शेजारी असलेल्या भाताच्या खचरात पलटी झाला.
सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. साईड पट्टी खचल्यामुळे येथून वाहतुक विस्कळीत होऊन महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या.त्यानंतर येथूनच पुढे काही अंतरावर नगर कडून कल्याणला जाणारा ट्रक महामार्गावर साईड गटारीत कलंडला.
या दोन्ही घटनामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली.नगर कल्याण महामार्गावरून माळशेज घाट मार्ग दररोज हजारो वाहने येजा करतात.त्यात सुट्टीचे दिवस असल्याने माळशेज घाटात वर्षा विहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते त्यामुळे या वाहतुक कोंडीचा मोठा त्रास सर्वांनाच सहन करावा लागला.
सदर घटना कळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड यांच्या दहा जणांच पथक पाठवून येथील ऐकेरी वाहतुक सुरळीत सुरू केली.तसेच क्रेनच्या साह्याने एक ट्रक बाजूला ओढून काढण्यास मदत केली.ओतूर पोलीसांकडून रात्री उशीरा पर्यंत याभागात वाहतूक नियंत्रण व वाहनचालकाना मार्गदर्शनाच काम सुरूच होते.त्यामुळे माळशेज घाटातून ऐकेरी वाहतूक सुरळीत सुरू होती.