‘आमदार फोडण्यापेक्षा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करा’ : राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । : मुंबई-गोवा महामार्ग जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत पनवेल ते सावंतवाडी मधील कार्यकर्त्यांनी असे आंदोलन करा की शासनाला तात्काळ रस्ता करावा लागेल. आंदोलनाची सरकारमध्ये दहशत निर्माण झाली पाहिजे, असे आंदोलन करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथील मुंबई- गोवा महामार्गासाठी निर्धार मेळाव्या दरम्यान केले.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला वेग मिळावा आणि हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे यासाठी, पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई- गोवा महामार्ग निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, अमित अभ्यंकर, नितीन देसाई, अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गाच्या कामावर भाष्य करताना, चांद्रयान ३ ची आठवण त्यांनी करून दिली. हे यान चंद्रावर जाऊन फक्त खड्डे पाहणार आणि फोटो काढणार, त्यासाठी कोट्यवधींचा खर्च होणार आहे. हे यान चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यातील मुंबई-गोवा महामार्गवरील खड्डे पाहण्यासाठी पाठवले असते, तर एवढा खर्च आला नसता असा टोमणा ठाकरे यांनी लगावला. या महामार्गासोबत अन्य रस्त्याची अवस्था देखील दयनीय असल्याचे त्यांनी सांगून, या महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल ते सावंतवाडी मधील कार्यकर्त्यांनी दहशत निर्माण होईल असे आंदोलन करण्याचा आदेश दिला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील मश्किल टिप्पणी करत हे सरकारमध्ये का गेले याची आठवण करून दिली. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी सरकारमध्ये बसण्याचा निर्धार केला. मंत्री छगन भुजबळ यांनी जेल मध्ये काय मिळते याची आठवण त्यांना करून दिली असेल, असा टोला त्यांनी लगावला.

समृद्धी महामार्गावर प्रवास करताना अमित ठाकरे यांचा ताफा टोल नाक्यावर अडवला आणि त्यानंतर काही तासात तो टोल मनसे कार्यकर्त्यांनी फोडला. त्यानंतर भाजप नेत्यांनी टीका करत पहिले रस्ते बांधायला शिका टोल उभा करायला शिका अशी टिपण्णी केली होती. याला आज राज ठाकरे यांनी उत्तर देत भाजपवर निशाणा साधला. भाजप नेत्यांनी दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडण्यापेक्षा पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *