जोडून आलेल्या सुटय़ांमुळे लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची उच्चांकी गर्दी ; पावसाच्या विश्रांतीमुळे पर्यटकांचा हिरमोड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुटय़ांमुळे लोणावळा, खंडाळा परिसरात मंगळवारी पर्यटकांची उच्चांकी गर्दी झाली. भुशी धरण परिसरात झुंबड उडाली होती. उच्चांकी गर्दीचे नियोजन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वर्षांविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.

दर वर्षी स्वातंत्र्य दिनी लोणावळा, खंडाळा परिसरात मुंबई, पुण्यासह राज्यातील वेगवेगळय़ा भागांतून पर्यटकांची गर्दी होती. पर्यटक मोठय़ा संख्येने मोटारीतून दाखल होत असल्याने लोणावळा, खंडाळा, तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. गर्दी, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांसह गृहरक्षक दलाचे जवान, वाहतूक स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. उच्चांकी गर्दी होऊनही अनुचित घटना घडल्या नाहीत, तसेच कोंडीही झाली नाही. लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्यासह लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सहारा पूल परिसरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुण्याहून येणाऱ्या लोकल गाडय़ांमधून मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळा स्थानक परिसरात आल्याने तेथे गर्दी झाली होती. लोणावळा रेल्वे स्थानक ते भुशी धरणापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटकांना रांगेत चालण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. त्यामुळे या भागात कोंडी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सहारा पुलासमोरील धबधबा कोरडा पडला आहे. भुशी धरण परिसरात पर्यटकांची झुंबड उडाल्याने या भागातून चालणे अवघड झाले होते. भुशी धरणातील पायऱ्यांवरून वाहणारे पाणी कमी झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. लायन्स पॉइंट परिसरात पर्यटकांची गर्दी कमी होती. मात्र, दिवसभर या भागात धुके होते. एकवीरा मंदिर ते भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, भाजे लेणी, कार्ला लेणी, पवना धरण परिसर, तसेच राजमाची गार्डन परिसरात गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *