Mhada Lottery 2023 : ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण, हे स्वप्न साकार करण्यासाठी बऱ्याच नियोजनाचीही गरज लागते. कारण, घर घेण्यापूर्वीच्या आर्थिक नियोजनामध्येच अनेकजण हार मानतात. घरांच्या सातत्यानं वाढणाऱ्या किमती आणि मग नाईलाजानं करावी लागणारी तडजोड हे सर्वकाही इथं ओघाओघानं आलंच. पण, आता मात्र तुम्हाला एक दिलासा मिळू शकतो. कारण, म्हाडा पुन्हा एकदा हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी तुमची मदत करणार आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा म्हाडाच्या घराची सोडत निघणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4082 घरांसाठीची सोडत नुकतीच जाहीर झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठीच्या सोडतीबाबत वक्तव्य केलं. त्यानुसार पुणे मंडळातील पाच हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

घरांचा आकडा मोठा…
ऑक्टोबरमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी म्हाडाकडून कोकण, पुणे, औरंगाबादमधील 10 हजार घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोडतीमध्ये पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या अंदाजे साडेचार हजार तर, औरंगाबाद मंडळाच्या जवळपास 600 घरांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

म्हाडाच्या या सोडतीसाठी 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्यानंतर याच दिवसापासून अर्ज विक्री – स्वीकृतीला सुरुवात होईल. सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे. या सोडतीमध्ये पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे.

‘या’ सोडतीकडेही लक्ष ठेवा…
ठाणे, डोंबिवली आणि अन्य ठिकाणच्या अंदाजे साडेचार हजार घरांसाठी ऑगस्टअखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळं या सोडतीवरही लक्ष ठेवणं फायद्याचं ठरेल. येत्या काळात औरंगाबाद मंडळानेही अंदाजे 600 घरांसाठीच्या सोडतीच्या जाहिरातीसाठीची तयारी सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे. यामध्ये औरंगाबाद, आंबेजोगाई आणि लातूरमधील घरांचा यात समावेश असेल. परिणामी दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांच्याच हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *