महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । श्रावणाच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वरला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. गर्दीचा ओघ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर ट्रस्टने दर्शनाचे नियोजन जाहीर केले आहे. संपूर्ण श्रावणात त्र्यंबकराजाचे मंदिर पहाटे ५ पासून रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले राहील, तसेच प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजता उघडले जाईल.
भक्तांना पूर्व दरवाजा दर्शन बारीतून धर्मदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. उत्तर महाद्वारातून देणगी दर्शनासाठी अर्थात 200 रुपये तिकीट घेऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. स्थानिक गावकरी, भाविकांना मंदिर उघडल्यापासून सकाळी १०:३० वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक असल्याचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. स्थानिक गावकऱ्यांना ओळखपत्र दाखविल्यावर उत्तर महाद्वारातून तिकीट दर्शनाची रांग असेल तेथून प्रवेश दिला जाणार आहे.