आठवड्याअखेरीस अखेर पाऊस परतला ; राज्यात या भागात आजपासून पाऊसधारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ ऑगस्ट । मान्सून राज्यातून काढता पाय घेतो की काय असं वाटत असतानाच आता या पावसानं पुनरागमन करत अनेकांनाच दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून हवामान विभागानंही पाऊस परतण्याच्या शक्यता वर्तवल्या होत्या. पण, तो काही परतला नाही. आता मात्र हवामान विभागाची ही भविष्यवाणी खरी ठरण्यासाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे. थोडक्यात ऑगस्टचा आणखी एक संपूर्ण आठवडा कोरडा जातो की काय असं वाटत असतानाच आता पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासूनचं हे पावसाळी वातावरण पाहता ‘अंत भला तो सब भला’, असंच सर्वजण म्हणताना दिसत आहेत.

विदर्भासह मराठवाड्यातही शुक्रवारी पावसानं हजेरी लावली. तर, तिथं पुणे, नाशिकसह सातारा आणि घाटमाथ्यावरील परिसरातही काळे ढग दाटून आले आणि मनसोक्त बरसले. ज्यामुळं वातावणात गारवा पसरला. हवामन तज्ज्ञांनुसार 1972 नंतर पावसात व्यत्यय येण्याची ही दुसरी वेळ ठरली असून, जर हा पाऊस आणखी काही दिवस परतलाच नसता तर, सर्वात कोरड्या ऑगस्ट महिन्याची नोंद झाली असती. मागील 100 वर्षांमध्ये असं कधीच घडलं नव्हतं ही बाब महत्त्वाची. दरम्यान भारतीय हवामान विभागानं येत्या चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत पुढील आठवड्यात हा मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी पुन्हा सक्रीय होईल. तिथे ऑगस्टच्या अखेरपर्यंत पावसात सातत्य पाहायला मिळेल. यादरम्यान मध्य भारतात मात्र पावसाचं प्रमाण कमी राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली.

IMD अर्थात भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राकडून हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला. ज्याअंतर्गत शुक्रवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरात चांगला पाऊस झाला. शनिवारी म्हणजेच पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट नसला तरीही अहमदनगर आणि सोलापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार चा यात समावेश नाही. 20 ऑगस्टसाठीही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

फक्त विदर्भ- मराठवाडाच नव्हे, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल. तर, त्यापुढील दोन दिवस म्हणजेच 21 आणि 22 ऑगस्टलाही अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते असं हवामान विभागाचं मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *