ईडीकडून तब्बल 50 किलो सोने जप्त ; मनिष जैन यांची प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही राजमल लखीचंद…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ ऑगस्ट । जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर 40 तासाहून अधिक काळ ईडीने छापेमारी केली. जळगावच्या इतिहासातील ईडीने केलेली ही सर्वात मोठी छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीच्या 60 अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शॉपवर छापेमारी केली. या छापेमारीची स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली नाही. शॉपभोवती जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल दोन दिवसाहून अधिक दिवस चाललेल्या या छापेमारीत ईडीने मोठं घबाड जप्त केलं आहे. या छापेमारीनंतर माजी आमदार मनिष जैन यांनी छापेमारी झाली तरी आम्ही हिंमत हरलेलो नाही, असं स्पष्ट केलं. तर माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी राजकीय दबावातून ही छापेमारी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

ईडीच्या छापेमारीनंतर मनिष जैन यांनी मीडियाशी संवाद साधला. ईडीच्या काही काही अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. त्यांचे आभार मानतो. त्यांनी त्यांची कारवाई पूर्ण केली आहे. या कारवाईत कुठला राजकीय दबाव होता की नाही हे आता न बोललेलं बरं. त्यांनी जे जे आम्हाला विचारला आम्ही त्यांना ते दिलं आहे. ईडीने मोठ्या प्रमाणावर पैसे, दागिने तसेच कागदपत्र जप्त केलेली आहेत, असं मनिष जैन यांनी सांगितलं.

पुन्हा भरारी घेऊ
आम्ही हिंमत हरलेलो नाही. आम्ही राजमल लखीचंद जैन आहोत. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही पिढ्या न् पिढ्या शुद्धता आणि विश्वास जपून आहे. लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा भरारी घेऊ आणि पुन्हा नव्याने उभे राहू, असं मनिष जैन यांनी स्पष्ट केलं.

राजकीय हेतूने कारवाई
दरम्यान, माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचं म्हटलं आहे. मी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आहे. आताही शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असंही ईश्वरलाल जैन यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *