पिंपरी येथे पत्रकारांच्या गौरव संमारंभात राज ठाकरेंनी घेतला पत्रकारांचाच समाचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ ऑगस्ट । सध्या राजकारणी अतिशय वाह्यात बोलत आहेत, तरीही त्यांची वक्तव्ये माध्यमे वारंवार का दाखवतात?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. पिंपरी येथे पत्रकारांच्या गौरव संमारंभात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता अजूनही जिवंत आहे, ती कायम जिवंत ठेवा, असे आवाहन करत माध्यमांवर खोचक टीकाही केली व काही सूचनाही केल्या.

त्यांच्या शब्दांची जागा शौचालयात
राज ठाकरे म्हणाले, सध्याची पत्रकारिता म्हणजे हा नेता काय म्हटला आणि त्यावर तो नेता काय बोलला? एवढेच सुरू आहे. अशा राजकारण्याला एकट्याला बोंबलू द्या ना शौचालयात. तिथे जे बाहेर पडायच ते माध्यमे समोर आले की त्याच्या तोंडातून बाहेर पडते आणि माध्यमेही वारंवार त्याच्यासमोर आपला बूम घेऊन जातात. तेच लोक बघतात. याला काय पत्रकारिता म्हणायचे?

ट्रोलर्सचे मॅसेज वाचताच कशाला?
राज ठाकरे यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांचीही चांगलीच खिल्ली उडवली. ट्रोलिंगची चिंता करू नये, असे सांगत पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, एकदा मुलाखत दिल्यानंतर त्याच्यावरच्या प्रतिक्रिया का वाचता? ट्रोल करणाऱ्यांचे मेसेज वाचताच कशाला? ती राजकारण्यांनी पाळलेली लोक आहेत. त्यांना महिन्याला पैसे मिळतात. हे निरुद्योगी लोकं आहेत. त्यांना कामधंदा नाही. त्यांचे एकच काम आहे. मोबाईल हातात घेतला की मार याची आणि घाल बोटं, अशा शब्दात राज ठाकरेंनी ट्रोलर्सवर हल्लाबोल चढवला.

मोबाईलमुळे निरुद्योगी वाढले
पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, तुम्ही म्हणता लिहिल्यावर तुम्हाला ट्रोल केले जाते. मग वाचता कशाला? मुलाखत झाली, भाषण झाले, एकदा शब्द गेले ना. मग कुणाला काय वाटेल ते वाटेल. कुणाला आवडेल, कुणाला नाही. हे कशाला वाचत बसता. त्यावर चार शिव्या पडतात. मग आमचा हिरमसून बसतो. कशाला वाचता? मोबाईल नावाचे खेळणे आल्यापासून अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले.

पाळलेल्या लोकांकडे कशाला लक्ष देता
राज ठाकरे म्हणाले, ट्रोल करणाऱ्याला काही पडलेली नसते. तुम्ही कशाला वाटून घेता. त्यांना मागच्या पुढचा इतिहास माहीत नसतो. मुलाखत ऐकलेली नसते. राजकीय लोकांनी पाळलेली ही लोक आहेत. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता? त्यांना लिहायचे दर महिन्याला पैसे मिळतात. त्यांचा कसला विचार करता? जे महाराष्ट्र हिताचे असेल, मराठी माणसाच्या हिताचे असेल त्यावर निर्भिडपणे बोलणे आणि लिहिण्याची गरज आहे.

हीच तुमची ब्रेकिंग का?
राज ठाकरे म्हणाले, माझ्या घरासमोर नेहमी पत्रकारांचा घोळका असतो. एखादा कार्यक्रम असला आणि मी घराबाहेर पडलो की लगेच ब्रेकिंग न्यूज दाखवतात. राज ठाकरे घराबाहेर निघाले. अरे, ही काय ब्रेकिंग न्यूज झाली तुमची. घरात असलो आणि माझे बोट दिसले तरी ब्रेकिंग न्यूज राज ठाकरेंचे बोट दिसले, हात दिसला. आता आणखी माझे काय-काय पाहायचे आहे तुम्हाला? पूर्वी दूरदर्शनवर ब्रेकिंग न्यूज दिसली की आम्हाला धडकी भरायची, आता काय दाखवणार आहे म्हणून. मात्र, आता याचे बोट आणि त्याचे बोट, असा खेळ चालू आहे. ब्रेकिंग न्यूजचा दर्जाच घालवला.

काही पत्रकार मंत्र्यांकडे कामाला
राज ठाकरे म्हणाले, आज अनेक उत्तम सुसंस्कृत पत्रकार आहेत. तसेच, वाया गेलेले पत्रकारही अनेक आहेत आणि ते प्रमुख हुद्द्यावर बसलेले आहेत. मी नागपूरला गेलो परवा. मला लाज वाटली. मला तिथे अनेक पत्रकार भेटले. म्हटले काय चालले? ते म्हणाले मंत्र्याकडे कामाला आहे. मंत्र्यांकडे कामाला लागले पत्रकार? मला अजूनही आठवते 20-25 वर्षापूर्वी मोजके पत्रकार लपून छपून हे करत होते. आता उघड करत आहेत. मग जेव्हा आमच्या पत्रकार परिषदा होतात तेव्हा लेबल लावलेले लोक येतात तेव्हा आम्ही काय उत्तरे द्यावीत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *