महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । पुणे शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी आवक वाढल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची, कारली यांच्या दरांत घसरण झाली. कांद्यावर निर्यात शुल्क ४० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरातही घट झाली आहे.
मार्केट यार्डात रविवारी (२० ऑगस्ट) महाराष्ट्रासह विविध राज्यातून सुमारे ११० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये कर्नाटक, गुजरात येथून कोबी सुमारे चार टेम्पो आणि हिरवी मिरची सुमारे १२ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून चार टेम्पो शेवगा, इंदूर येथून १० टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा चार टेम्पो, गुजरात येथून भुईमूगाच्या शेंगा सुमारे दोन टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे १० टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून सातारी आले सुमारे सातशे गोणी, गवार पाच टेम्पो, भेंडी आठ टेम्पो, कोबी पाच टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, टोमॅटो सुमारे ११ हजार क्रेट्स, तांबडा भोपळा आणि सिमला मिरची आणि काकडी प्रत्येकी १० टेम्पो, भुईमुग शेंगा सुमारे १०० गोणी, पुरंदर, वाई सातारा येथुन मटार आठ टेम्पो, कांदा सुमारे ८० ट्रक, इंदूर, आग्रा भागातून बटाटा ४५ ट्रक आवक झाली होती.
आलं, लसूण तेजीतच:
मार्केट यार्डातील टोमॅटो प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर होता. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर प्रतवारीनुसार प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांच्या घरात आले आहेत. तर, लसूण आणि आल्याचे दर मात्र तेजीतच आहेत. घाऊर बाजारात लसणाचा प्रतिकिलोचा दर ९५ ते १६० रुपये होता. आलं १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो दर होता.
पालेभाज्यांचे दर स्थिर:
मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीच्या दीड लाख आणि मेथीच्या ७० हजार जुड्यांची आवक झाली. आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याने दरही स्थिर आहेत. घाऊक बाजारात कोथिंबीरीची गड्डी तीन ते आठ रुपये आणि मेथीची गड्डी सात ते १० रुपये दराने विक्री झाली. तर, शेपू सहा ते आठ रुपये, कांदापात आठ ते १५ रुपये, चाकवत चार ते सात रुपये, करडई तीन ते सहा रुपये, पुदीना तीन ते आठ रुपये, अंबाडी चार ते सात रुपये, राजगिरा चार ते सहा रुपये, चुका चार ते सात रुपये, चवळई तीन ते सहा रुपये आणि पालक आठ ते १२ रुपये दर होता.