छत्रपती संभाजीनगरकरांना पुणे आणि गोव्याला विमानाने जाता येणार; ‘या’ महिन्यात होणार वाहतूक सुरु

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । चिकलठाणा विमानतळावरून सध्या फक्त तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. या शहरातून अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘फ्लाय-९१’ या कंपनीकडून आगामी काही महिन्यांत विमानसेवेचा देशांतर्गत विकास केला जाणार आहे. या विमान कंपनीकडे पुणे आणि गोवा या दोन मार्गांवर विमान सेवा चालविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

‘औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिऐशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी ‘फ्लाय-९१’च्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. या विमान कंपनीने गोवा येथून विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भेटून कोठारी यांनी त्यांच्या भविष्यातील विमानसेवा विस्ताराबाबत विचारणा केली. या कंपनीकडून नोव्हेंबर महिन्यात ७२ आसनक्षमता असलेल्या दोन विमानांच्या माध्यमातून विमान प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. मार्च २०२४मध्ये सहा विमाने दाखल होणार आहेत.

याबाबत चर्चा करताना, चिकलठाणा विमानतळाच्या विविध सुविधांविषयी सुनित कोठारी यांनी फ्लाय-९१ च्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. शहरातून गोवा पर्यटनासाठी येणारा मोठा वर्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात ७२ आसनक्षमता असलेले विमान पुणे, नागपूर आणि गोव्यासाठी सुरू करता येईल, असा प्रस्तावही विमान कंपनीसमोर ठेवला. ‘फ्लाय-९१’च्या अधिकाऱ्यांनी कोठारी यांच्या प्रस्तावावर वाणिज्यिक विभागाकडून माहिती व सर्वेक्षण केल्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या सहा मार्गांचे दिले प्रस्ताव:
या बैठकीत ‘एटीडीएफ’च्या वतीने सुनीत कोठारी यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून पुणे, नागपूर आणि गोवा असा प्रस्ताव दिला आहे. जळगाव येथून मुंबई, पुणे आणि इंदूर अशी विमाने सुरू होऊ शकतात, असाही प्रस्ताव दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *