महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत काही प्रमाणात तेजी आली आहे. यामुळे मागील १८ दिवसांत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. आज बुधवारी पेट्रोल दरवाढ थांबली असली तरी सलग १८ व्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली. गेल्या १८ दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर १०.४८ रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोल ८.५० रुपयांनी महागले आहे. देशाची राजधानी दिल्लीत पहिल्यांदाच डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा अधिक झाला आहे. मात्र, दिल्ली सोडून अन्य राज्यांत पेट्रोलच्या तुलनेत डिझेल स्वस्त आहे. 
बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७९.७६ रुपये आहे. तर डिझेल ४८ पैशांनी वाढून ७९.८८ रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या दरात सातत्याने झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत बदल केला जातो. सकाळपासूनच नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात सीमा शुल्क, डिलर कमीशन तसेच इतर खर्च जोडण्यात आल्यानंतर त्यांचे दर जवळपास दुप्पट होतात. विदेशी मुद्रा तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड किंमतीच्या आधारे दररोज पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात बदल केला जातो. या मापदंडानूसार पेट्रोल, डिझेलचे दर रोज निश्चित करण्याचे काम तेल कंपन्यांकडून केला जातो. पेट्रोल पंप चालक स्वत:चा नफा जोडून पेट्रोलची विक्री करतात. पेट्रोल, डिझेलच्या दरात हा खर्चही जोडला जातो. देशातील पेट्रोल-डिझेलवरील कर ६९ टक्के झाला आहे. जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात भारतात पेट्रोल-डिझेलवर ५० टक्क्यांपर्यंत कर होता. विकसित अर्थव्यवस्थेत अमेरिकेत १९ टक्के, जापान मध्ये ४७ तसेच ब्रिटेनमध्ये ६२, फ्रान्समध्ये ६३ टक्के करस्वरूपात वसूल करण्यात येतो.