पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण शंभर टक्के भरले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण तुडूंब भरले आहे. धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. मात्र, महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआडच सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. जुलै महिन्याच्या दुस-या पंधरवाड्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. १ जून पासून धरण परिसरात दोन हजार १६२ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात ८३ टक्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा होईल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, दररोज पाणीपुरवठा केल्यास चढावरील भागात पाणीपनरवठ्यात अडचण येते. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे सर्वांना समान पाणी मिळत आहे. त्यामुळे दिवसाआडच पाणी पुरवठ्यावर प्रशासन ठाम आहे. दररोज पाणीपुरवठ्यासाठी शहरवासीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत धरण १०० टक्के राहिल्यानंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाणी पुरेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *