ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन:मुंबईत राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. सीमा देव गत काही वर्षांपासून अल्झायमरने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज सकाळी त्यांनी मुंबईतील आपल्य राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, सीमा देव गत काही वर्षापासून वृद्धत्वाशी संबंधित आजारांनी त्रस्त त्यांना अल्झायमरचेही निदान झाले होते. त्यांचे पती तथा ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे गतवर्षी 2 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तेव्हापासून त्या आपला धाकटा मुलगा अभिनव देव यांच्या वांद्रे स्थित येथील निवासस्थानी राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा अजिंक्य देव एक आघाडीचा अभिनेता आहे. तर अभिनवही दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे.

सीमा देव यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ऑर्केस्ट्रात गाणीही गायली

सीमा रमेश देव यांचा जन्म 27 मार्च 1942 मुंबई येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असे होते. मुंबईतील गिरगावात त्यांचे बालपण गेले. त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला तेव्हा महिलांसाठी अभिनयसृष्टी सोपी नव्हती. पण त्यानंतरही त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा या चंदेरी दुनियेत उमटवला. सीमा देव यांनी शालेय जिवनापासूनच नृत्याची आवड जोपासली. त्या कल्याणजी-आनंदजींपैकी आनंदजींच्या ऑर्केस्ट्रात गाणी गात होत्या.

‘आलिया भोगासी’ चित्रपटातून पदार्पण

सीमा यांनी 1957 साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी हिंदी – मराठी आदी जवळपास 80 चित्रपटांत भूमिका केल्या. यात आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला आदी गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची छोटी परंतु संस्मरणीय ठरली.

2017 मध्ये मिळाला होता जीवनगौरव पुरस्कार

सीमा देव यांना 2017 मध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या मोलकरीण या चित्रपटातील ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर’ हे गाणे प्रचंड गाजले. रमेश देव व सीमा देव या पती – पत्नींनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. यात आनंद या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटाचाही समावेश होता. या दोघांची जोडी मराठी सिनेसृष्टीतली एक सदाबहार जोडी म्हणून ओळखली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *