महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१४ मे ।। म्हाडाच्या मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या 17 भूखंडांचा लिलाव चौथ्यांदा लांबणीवर पडला आहे. इच्छुकांना आता 25 मेपर्यंत निविदा सादर करता येणार असून अर्जांची छाननी झाल्यानंतर जूनमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यापूर्वी निविदा सादर करण्याची मुदत 10 मेपर्यंत होती.
म्हाडाने मालाड मालवणी, चारकोप, विक्रोळीतील टागोरनगर आणि कन्नमवार नगर, शीव येथील प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी ओशिवरा अशा मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या 17 भूखंडांच्या विक्रीसाठी मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे रुग्णालय, प्राथमिक शाळा, महाविद्यालय, खेळाचे मैदान, बहुद्देशीय समाज हॉल यासाठी हे भूखंड आरक्षित असून त्या आरक्षणानुसारच या भूखंडाचा वापर करता येणार आहे.
विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडाच्या विक्रीसाठी म्हाडाने 45 हजार 300 रुपये प्रति चौरस मीटर ते 1 लाख 6 हजार 170 रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित केली आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना हे भूखंड वितरित करण्यात येतील. या माध्यमातून म्हाडाला तब्बल 375 ते 400 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.