महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१४ मे ।। 10 जून रोजी होणारी मुंबई व नाशिक शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शिक्षक भारतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही निवडणूक 15 जूननंतर म्हणजेच शाळा सुरू झाल्यावर घेण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली होती. शिक्षक भारतीच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी शिक्षक भारतीच्या मागणीचा विचार करून उद्या अंतिम निर्णय घेऊ असे न्यायालयासमोर सांगितले.
मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर जाणारे शिक्षक व कर्मचारी 10 जून रोजी निवडणूक झाल्यास मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे जूनच्या शेवटी मतदान घ्यावे अशी मागणी शिक्षक भारतीने याचिकेत केली. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उत्तर हिंदुस्थानातील शिक्षक टीचर्स स्पेशल ट्रेनने 11 जून रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबाह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. या सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.
शिक्षक भारतीच्या वतीने कार्याध्यक्ष सुभाष मोरे, उत्तर विभाग अध्यक्ष अकबर खान आणि शिक्षक भारतीचे पदाधिकारी हिंदूराव देशपांडे यांनी याचिका दाखल केली आहे. अॅड. सचिन कुंडे यांनी शिक्षक भारतीची बाजू न्यायालयासमोर मांडली.