महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । आयपीएलचा ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये आज होणार आहे. कोलकाता येथील इडन गार्डन्सच्या मैदानावर दोन्ही संघाची भिडत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होणार आहे. हा सामना केकेआरसाठी महत्त्वाचा आहे. कारण मुंबईला पराभूत केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला प्ले ऑफचे तिकीट मिळणार आहे. कोलकता संघ आयपीएल २०२४ च्या पॉईट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला आहे. दरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचा हंगाम निराशाजनक राहिला.
KKR विरुद्ध MI पिच रिपोर्ट
यंदाच्या मोसमात इडन गार्डन्सच्या मैदानावर संघांनी धावांचा डोंगर उभारलाय. या मैदानावर पंजाब किंग्सने टी- २० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता, तर राजस्थान रॉयल्सनेही २२४ धावा केल्या होत्या. या मैदानावर केकेआरने आरसीबीसमोर २२३ धावांचे आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना आरसीबीचा पराभव झाला होता. तर दिल्लीचा संघ या मैदानावर फक्त १५३ धावा करू शकला होता. हा सामना केकेआरने १६ षटकांमध्ये जिंकला होता.
या सर्व बाबी बघता आजही चाहत्यांना रोमांचकारी सामना पाहायला मिळू शकेल, अशी शक्यता आहे. नाणेफेक जिंकून कोणता संघ प्रथम गोलंदाजी घेतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल, तर गोलंदाजी घेणारा संघ विकेट घेण्याच्या प्रयत्नात असेल.
इडन गार्डन्सवरील आयपीएलची आकडेवारी आणि रेकॉर्ड
या स्टेडियमवर आतापर्यंत ९२ सामने झालेत. यात प्रथम फंलदाजी करणारा संघांनी ३७ सामने जिंकलेत. तर ५५ सामने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकलेत. नाणेफेक जिंकणारे संघाने ४९ वेळा सामने जिंकलेत. तर ४३ सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या संघांचा पराभव झालाय. या स्टेडियमवर सर्वात मोठी धावसंख्या २६२/२ अशी राहिलीय तर सर्वात कमी धावसंख्या ४९ राहिलीय.
KKR विरुद्ध MI हेड टू हेड रिकॉर्ड
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात एकूण ३३ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २३ सामन्यात एमआयचा विजय झालाय. तर केकेआरला केवळ १० विजय मिळाले आहेत. या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आलेत. पहिल्यावेळी एमआयचा पराभव झाला होता.