रानभाजीचे नाव:-करटोली ; शास्त्रीय नाव – Momordica dioica

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – ही एक पावसाळ्यात मिळणारी फळभाजी आहे.ही दिसते कारल्यासारखी,कडूही असते.कारल्याची जशी भाजी करतात तशीच भाजी करावी. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट परिसरात आढळतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी करटोलीची काही प्रमाणात शेतात लागवड करतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षायू असून, औषधात वापरतात.करटोलीच्या भाजीच्या सेवनामुळे अनेक आजारांना दूर ठेवले जाते.म्हणून हिला जगातील एक शक्तीशाली भाजी म्हणतात.म्हणूनच या भाजीची निर्यात मोठया प्रमाणात होते.

खोड – नाजूक, आधाराने वर चढणारे असते.

पाने – साधी, एकाआड एक, रुंद, अंडाकृती, कडा दातेरी,

फुले – पिवळी, नियमित, एकलिंगी. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. फुले पानांच्या बगलेतून एकांडी येतात,

फळे लंबगोलाकार, फळांवर नाजूक काट्यांचे आवरण. बिया अनेक. तांबड्या गरात लगडलेल्या असतात.

करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात.

कंद लंबगोलाकार, पिवळट-पांढरे असून, त्यावर गोल कंकणाकृती खुणा असतात व त्यांची रुची तुरट असते.

उपयोग

* या भाजीमध्ये मांसाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांच्या बरोबरीने प्रथिने असतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँटीऑक्सिडंन्ट्स देखील
असतात.
* करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा अंगरस डोक्याला चोळतात.
* कंदाचे चूर्ण मधुमेहात खायला देतात.
* करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत होणारा रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहेत. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून
येणाऱ्या तापात उपयुक्त आहे.
* पाने कृमिनाशक असून, ताप, बद्धकोष्ठता, दमा, उचकी, यावर गुणकारी आहेत.
* करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक असते.
* कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात.
* करटोलीची फळे पावसाळ्यात बाजारात येतात.ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.
* मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
* सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे.
* त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्‍य खावी.
* तेव्हा ही फळभाजी बाजारात आलेली दिसते. या बहुगुणी रानभाजीचा यथेच्छ आस्वाद घ्या व निरोगी रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *