महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१५ मे ।। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन महाराष्ट्र हाती घेत निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात अनेकदा हजेरी लावली आणि त्यांचं हे सत्र अद्यापही सुरुच आहे. बुधवारी नाशिक आणि कल्याणमध्ये पंतप्रधानांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, सायंकाळी घाटकोपरमध्ये रोड शोसुद्धा पार पडणार आहे.
वाहतुकीत महत्त्वाचे बदल
पंतप्रधान मुंबईत येत असल्या कारणानं शहरातील वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
वाहतूक बंद
वाहतुक शाखेच्या निर्णयानुसार शहरातील पुढील रस्त्यांवर दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील.
कुठे वाहतूक बंद?
वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांमध्ये एलबीएस रोडवर गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शनचा समावेश आहे.
रस्त्यांची नावं
माहुल – घाटकोपर रोडवर मेघराज जंक्शन ते आरबी कदम मार्गापर्यंत वाहतूक बंद राहील. तर, अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर घाटकोपर जंक्शन पासून ते साकीनाका जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल.
प्रवासमार्ग
हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स पासून ते गुलाटी पेट्रोल पंपापर्यंत आणि गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्टेशन वेस्ट पासून ते सर्वोदय जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल.
पर्यायी मार्ग
वाहतूक बंद असेल त्या वेळेत ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हाइवे, अंधेरी-कुर्ला रोड, साकी विहार रोड, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), सायन बांद्रा लिंक रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.