महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१६ मे ।। जिल्ह्यात दुष्काळाने हाहाकार माजवला असतानाच मोठे प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्या धोम-बलकवडी तसेच उरमोडी धरणांनी तळ गाठला आहे. येरळवाडी तसेच राणंद हे मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. नाममात्र पाणीसाठा असलेले नेर, आंधळी, नागेवाडी तसेच वांग (मराठवाडी) या मध्यम प्रकल्पात लवकरच खडखडाट होण्याची शक्यता आहे. प्रमुख धरण पाणीसाठ्याचा विचार करता गतवर्षीच्या तुलनेत 12.24 टीएमसीची तूट भरुन काढणे जलसिंचन विभागासमोर आव्हानाचे बनले आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम व उत्तर भागांत 9 मोठे पाणी प्रकल्प असून दुष्काळी सातारा, सोलापूर, सांगली तसेच पुणे जिल्ह्याच्या काही भागास या धरणांतून पाणी दिले जाते. जिल्ह्याच्या पश्चिम व पूर्व भागात 10 मध्यम प्रकल्प असून ते 0.230 ते 2.730 टीएमसी इतक्या क्षमतेचे आहेत. काही पाझर तलावांची कामेही करण्यात आली आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी प्रकल्प आहेत. मात्र, गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने बहुतेक पाणीप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्केइतकेच पाणी धरणांमध्ये आले. काही धरणांमध्ये याची टक्केवारी 15 ते 20 इतकीही आहे. त्यातच पावसाने लवकर आटोपते घेतल्याने हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी सिंचन मंडळाला कधी नव्हे ती पहिल्यांदाच भर पावसाळ्यात सिंचनासाठी आवर्तने सुरू करावी लागली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी काही टीएमसीने कमी झाला.
जिल्ह्यातील काही भागात रब्बी हंगामातील पेरणी इतकाही पाऊस झाला नाही. मान्सून माघार काळात पडणार्या पावसानेही पाठ फिरवली. समोर दुष्काळाचे चित्र असताना शेतकर्यांचा रब्बी हंगामातील पेरा वाया जाऊ नये व पिके जगावीत यासाठी सिंचन मंडळाला लवकरच आवर्तने सुरू करावी लागली. फेब्रुवारीनंतर तर फारच बिकट अवस्था सुरु झाली. मार्च महिन्यातच वैशाख वणव्याचा अनुभव येऊ लागल्याने पाण्याची प्रचंड मागणी वाढली. आमदारांचाही कालवा सुरु झाला. धरणांतील शिल्लक पाणीसाठा आणि वाढत जाणारी पाणी मागणी यांचा मेळ घालणे सिंचन मंडळाला जिकिरीचे झाले. सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीचा नियोजनबध्द आराखडा तयार केल्याने गतवर्षीच्या तुलनेत पाण्याची तूट भरुन काढण्यात सिंचन मंडळाला काही प्रमाणात यश आले. ऊन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्याची प्रचंड मागणी पिण्यासाठी व सिंचनासाठी होत आहे. मात्र, धरणांनी तळ गाठला आहे.
मोठे पाणीप्रकल्प असलेल्या निरा-देवघर धरणात 1.750 टीएमसी पाणी असून मागील वर्षी ते 3.83 टीएमसी इतके होते. भाटघर धरणात 2.520 टीएमसी पाणी असून मागील वर्षी या धरणात 3.76 टीएमसी इतका पाणीसाठा होता. वीर धरणात 3.420 टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी 4.09 टीएमसी इतका पाणीसाठा होता. जिल्ह्यातील 9 मोठ्या पाणी प्रकल्पांत 194.24 टीएमसीपैकी 40.68 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी त्याचे प्रमाण 52.92 टीएमसी इतके होते. एकूण धरण पाणीसाठ्याचा विचार करता 153.56 टीएमसी पाणी कमी आहे. गतवर्षीचा विचार करता 12.24 टीएमसी पाणीसाठ्याची तूट असून ती भरुन काढणे सिंचन मंडळासमोर आव्हान आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये येरळवाडी, राणंद या धरणांमध्ये पाण्याचा ठिपूस नाही. उर्वरित नेर 0.084, आंधळी 0.025, नागेवाडी 0.054, मोरणा-गुरेघर 0.588, उत्तरमांड 0.280, कुडाळी महू 0.716, कुडाळी -हातगेघर 0.076, वांग-मराठवाडी 1.414 टीमएमसी इतका पाणीसाठा आहे.