महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१७ मे ।। इयत्ता दहावी- बारावीची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम गतीने करून घेतले. आता निकालाची अंतिम तयारी झाली असून विद्यार्थ्यांना निकाल घरबसल्या पाहता यावा म्हणून पाच ते सहा संकेतस्थळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
इयत्ता बारावीचा निकाल २१ किंवा २२ मे रोजी जाहीर करण्याची तयारी बोर्डाने केली आहे. निकालाची अंतिम तारीख पुढील दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र बोर्डाने यावर्षी १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या. तर बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत पार पडल्या. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दहावीसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांची संख्या आणि इतर माहितीचा तपशील बोर्डाच्या निकालासोबत जाहीर केला जाणार आहे. त्याठिकाणीही विद्यार्थी निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल तपासण्यासाठी उमेदवारांची लिंक अधिकृत निकाल पोर्टलवर उपलब्ध दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे mahahsscboard.in, mahresult.nic.in व results.gov.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.
असा पहा परीक्षेचा निकाल
महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा
SSC/HSC निकाल लिंकवर क्लिक करा
रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा
१० वी किंवा १२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल
पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल
अनुत्तीर्णची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा
इयत्ता दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये लगेचच घेतली जाते. निकालापासून साधारणत: एक महिना त्यांना अभ्यासासाठी मिळतो.
पुरवणी परीक्षेचा निकाल काही दिवसांतच जाहीर केला जातो, या परीक्षेला फार विद्यार्थी नसतात. दरम्यान, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, त्यांनाही त्याच वर्षी पुढचे शिक्षण घेता यावे म्हणून पुरवणी परीक्षा निकालानंतर तातडीने घेतली जाते, असेही बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.