महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१७ मे ।। घरांच्या किमतींत २०२४च्या पहिल्या तिमाहीदरम्यान (जानेवारी ते मार्च) सरासरी वार्षिक १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतींमध्ये वार्षिक वाढ होण्यासोबत बंगळूर, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद आणि पुणे येथील सरासरी घरांच्या किमतींनी दोनअंकी वाढीची नोंद केली. तिमाही आधारावरदेखील बहुतांश शहरांमधील घरांच्या किमतींमध्ये उल्लेखनीय दोन ते सात टक्के वाढ झाली, असे ‘क्रेडाई नॅशनल-कॉलियर्स’च्या अहवालात म्हटले आहे.
गृहखरेदीदार व विकसकांसाठी बाजारपेठ अनुकूल राहिली असली, तरी देशातील विक्री न झालेल्या सदनिकांच्या संख्येत वार्षिक तीन टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्यातील विक्री न झालेल्या सदनिकांमध्ये वार्षिक १० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यानंतर दिल्ली एनसीआर व अहमदाबादचा क्रमांक होता, जेथे प्रत्येकी वार्षिक आठ टक्क्यांची घट झाली. या पहिल्या तिमाहीत प्रमुख आठ शहरांमधील विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या जवळपास १० लाख होती, ज्यामध्ये एमएमआरचा ४० टक्क्यांचा मोठा वाटा होता.
मागणीमुळे तिमाही आधारावर विक्री न झालेल्या सदनिकांमध्ये काहीशी घट झाली. हैदराबाद व बंगळूर येथेही विक्री न झालेल्या सदनिकांच्या संख्येत वार्षिक वाढ झाली आहे. विकसक उपलब्ध घरांची संख्या व अपेक्षित मागणीवर लक्ष ठेवून राहण्याची, तसेच नजीकच्या काळात योग्य वेळी नवे प्रकल्प सादर करण्याची अपेक्षा आहे. पुण्यात उच्चभ्रू परिसरात मोठ्या प्रमाणात नवे प्रकल्प दाखल झाल्याने किमतींमध्ये वाढ झाली असून, कॅम्प व बाणेर अशा प्रमुख ठिकाणी किमतीत २० ते २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी काळात चिंचवड, शिवाजी नगर व नगर रोड यांसारख्या भागात मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
स्थिर रेपो दर आणि बहुतांश प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधेमधील सुधारणा यांचे पाठबळ या वाढीला मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये व्याजदर कमी होण्याच्या शक्यतेमुळे आणखी चालना मिळण्याचा अंदाज आहे, असे कॉलियर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बादल याज्ञिक म्हणाले. मध्यम महागाई आणि किफायतशीरपणामुळे मागणी कायम राहण्याची अपेक्षा असून, किमतींमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, ज्यामुळे किफायतशीरपणा आणि महागाई-संबंधित किमतींमदरम्यान तफावत दूर होईल, असे ‘लियासेस फोरस’चे व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर म्हणाले.
अहवालातील ठळक बाबी…
बंगळूर व दिल्ली एनसीआरमध्ये घरांच्या किमतींत १९ टक्के व १६ टक्के वाढ
प्रशस्त घरांना मोठी मागणी, किमतींमध्ये वार्षिक २५ टक्के वाढ
पुण्यात विक्री न झालेल्या घरांमध्ये वार्षिक १० टक्क्यांची सर्वोच्च घट
प्रमुख आठ शहरांमधील विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या जवळपास १० लाख
देशभरातील गृहखरेदीदारांकडून प्रीमियम व लक्झरी घरांची मागणी वाढल्याचे दिसत आहे. किमतींतही वाढ झाली आहे, यामुळे कर्जव्यवसायात वाढ होण्यासोबत विविध सूक्ष्म-बाजारपेठाही उदयास येत आहेत. आर्थिक वर्ष २४-२५ मध्येदेखील ही गती कायम राहण्याची अपेक्षा आहे.
— बोमन इराणी, अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल