‘ईडी’ने जप्त केलेला पैसा गरिबांना देणार; पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१७ मे ।। सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईत जप्त करण्यात आलेला पैसा गरिबांमध्ये वाटण्यासाठी कायदा करण्याचा विचार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

ते म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत ‘ईडी’ निष्क्रिय होती. आमच्या सरकारच्या काळात ‘ईडी’ने प्रभावीपणे काम सुरू केले आहे. घोटाळेबहाद्दर आणि भ्रष्टाचार्‍यांवर छापे टाकून रक्कम जप्त केली जात आहे. ही रक्कम गरिबांमध्ये वाटण्यासाठी कायदेशीर सल्लामसलत केली जात आहे. गरिबांच्या पैशावर डल्ला मारून माया कमावलेल्यांवर छापे टाकून हा पैसा गरिबांना परत केला जावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्या अनुषंगाने कायदा करावा लागला, तरी आम्ही त्या द़ृष्टीने वाटचाल करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

देश चालविणे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मास आलेल्या मुलाचा खेळ नाही, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समाचार घेतला. 4 जूननंतर राहुल गांधी मौजमजेसाठी विदेशात जातील, असा टोला त्यांनी लगावला. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास गोरगरिबांच्या खात्यात वर्षाला खटाखट एक लाख रुपये जमा करण्याच्या राहुल गांधी यांच्या आश्वासनाची मोदी यांनी खिल्ली उडविली.उत्तर प्रदेशातील आजमगड येथील सभेल बोलताना मोदी म्हणाले की, रायबरेलीमधूनही शहजाद्याची विकेट खटाखट पडणार आहे.

अमेठीत त्यांचा पराभव झाला आहे. आता रायबरेलीमधूनही त्यांची हकालपट्टी होईल. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द केला जाणार नसल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला.

जागतिक वृत्तपत्रांत स्थान
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. जगातील प्रमुख वृत्तपत्रांनी लोकसभा निवडणुकीस पहिल्या पानावर स्थान दिले आहे. देशवासीयांचा मोदी गॅरंटीवर विश्वास असल्याचे यातून अधोरेखित होते, असे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *