महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१७ मे ।। बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन्स ज्या स्टाँग रुममध्ये ठेवण्यात आले. त्या रुमची सीसीटीव्ही बंद झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाने संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता शिरुरमध्येही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद झाल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. 24 तास हे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केले. मात्र याबाबत उप जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे.
याआधी बारामती तसेच साताऱ्यातही असाच प्रकार समोर आला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरळीतपणे चालू करण्यात आले. याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही ठेकेदारास कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
दरम्यान, एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत वारंवार आरोप केले जात असतानाच अशा प्रकारे सीसीटिव्ही बंद पडत असल्याने विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.