महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नाशिकमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी या गौफ्यस्फोटानंतर आमच्या संपर्कात आले, तरी आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये तटकरे येऊन गेले. आमच्या काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र, ते आमच्या संपर्कात नाहीत. आमच्या संपर्कात आले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही. जे पक्षातून गेले, त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही. पक्षाचं धोरण शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
नाशिकमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. यावर बोलताना देशमुख म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी मागे चार-पाच बॅग आणल्या, त्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याची सर्वत्र चर्चा झाली. आरोप झाले. त्यांचं पूर्वनियोजित ठरलेलं असणार की हेलिपॅडला आलो की, माझ्या बॅगा तपासा. म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम दूर होईल. हे सर्व नाटक मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. हा देखावा केल्याचं स्पष्ट दिसत आहे’.
नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी, या केलेल्या पंतप्रधान मोदींच्या टीकेवरही देशमुखांनी भाष्य केलं. ‘संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहिती आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. सर्व जगाला माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह चोरलं आहे. झेंडा चोरला नाव देखील चोरलं आहे. सर्व जगाला माहिती आहे की, उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे. मुख्यमंत्री शिंदेंची नकली शिवसेना आणि अजित पवारांची नकली राष्ट्रवादी आहे’, असे देशमुख यांनी सांगितलं.