महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। उन्हाळा सुरू झाला की या ऋतूत अनेक स्वादिष्ट फळे उपलब्ध होऊ लागतात. या हंगामात द्राक्षे, आंबा, टरबूज, खरबूज यासह अनेक स्वादिष्ट फळे बाजारात उपलब्ध आहेत. या ऋतूत ताजी फळे खाण्यात काही वेगळीच मजा असते. उन्हाळ्यातील एक फळ मात्र आता रंग बदलू लागले आहे.
आजवर आपण केवळ लालभडक कलिंगड असेल तरच ते खरेदी करत होतो. लाल भडक कलिंगड म्हणजे खरी गोड चव असे समिकरण लोकांनी घातले होते. पण, आता या कलिंगडाचा रंग बदललेला आहे. फक्त लालच नाही तर पिवळ्या रंगाचे कलिंगडही बाजारात उपलब्ध आहे.
पिवळे कलिंगड हे फळ अजून तितकेसे लोकप्रिय झालेले नाही, पण इंटरनेटवर ते खूप व्हायरल होत आहे. चला तर मग जाणून घेऊया या पिवळ्या कलिंगडाबद्दल…
आतापर्यंत कलिंगडाच्या लागवडीबाबत असे म्हटले जाते की, त्याची लागवड आफ्रिकेत प्रथमच सुरू झाली. कलिंगडाच्या बिया हजारो वर्षांपूर्वी आफ्रिकेत सापडल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर हळूहळू त्याच्या बिया जगभर पसरल्या आणि सर्वत्र त्याची लागवड होऊ लागली.
लाल कलिंगड पाठोपाठ आता पिवळ्या रंगाचेही कलिंगड ही बाजारात आले आहे. आफ्रिकेत पहिल्यांदाच त्याची लागवड झाल्याचेही बोलले जात आहे. पिवळे टरबूज बहुतेक वाळवंटी भागात घेतले जाते. पिवळे कलिंगड पिकवण्यासाठी कमी पाणी लागते. कमी पाण्यात चांगले पीक येत असल्याने याला डेझर्ट किंग म्हणतात.
पिवळ्या कलिंगडाचे फायदे
पिवळे कलिंगडालही चवीला लाल इतकेच गोड असते, पण रंगाप्रमाणे काही बाबतीत ते लाल कलिंगडापेक्षा वेगळे असते. लाल कलिंगडात लाइकोपीन नावाचे रसायन खूप महत्त्वाचे असते.
हे रसायन लाल कलिंगडमध्ये आढळते, तर पिवळ्या कलिंगडमध्ये ते आढळत नाही. पिवळे कलिंगड लाल रंगापेक्षा गोड असते आणि त्याची चव मधासारखी असते.
पिवळ्या कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात असते. पिवळ्या टरबूजमध्ये लाल टरबूजपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन असते.