महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। राजकारणातील अत्यंत अनपेक्षित बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या सोनिया दुहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’ अशी ओळख असलेल्या दुहान यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीला मागच्या दाराने हजेरी लावली. त्यानंतर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ‘तुतारी’ खाली ठेवत दुहान पुन्हा ‘घड्याळ’ बांधणार असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. सोनिया दुहान यांनी मागच्या दाराने लपूनछपून अजितदादांच्या बैठकस्थळी प्रवेश केला. दुपारी तीन वाजता अजित पवारांच्या उपस्थितीतच या दोघांचे प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान शरद पवारांना रामराम ठोकून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कालपासूनच होत्या. राजकीय वर्तुळाच्या भुवया या बातमीने उंचावल्या होत्या, तरी अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र आज सोनिया दुहान यांच्या पक्षांतराची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विशेष म्हणजे, जो माणूस स्वतःच्या आई-वडिलांचा, कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो एखाद्या देशा-प्रदेशाचा होऊ नाही शकत. आमची ओळख, आमचं पक्ष चिन्ह हे शरद पवार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत, असं सोनिया दुहान यांनी साधारण तीन महिन्यांपूर्वी ठणकावून सांगितलं होतं. सोनिया दुहान यांनी “अंत जल्दी आयेगा” अशा शब्दात अजितदादा गटाला इशाराही दिला होता.