जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीम डेटा मिळवण्यासाठी पुण्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। पोर्शे ही अलिशान कार कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बिल्डर विशाल अग्रवालच्या लाडक्या पुत्राच्या प्रतापांमुळे पुण्यातच नाहीत तर देशभरात बदनाम झाली आहे. पोर्शे कार भरधाव वेगात चालवत बिल्डरच्या मद्यधुंद लेकाने दोघांना उडविल्याने पोर्शे कारची चर्चा होत आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी पोर्शेची टीम पुण्यात दाखल झाली असून कारमध्ये रेकॉर्ड असलेली माहिती ताब्यात घेतली आहे.

पोर्शेची टीम आरटीओसोबत मिळून या कारची तपासणी करत आहे. कारची अशी तपासणी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कंपनीने केली होती. यामध्ये कारचा अपघातावेळचा वेग, कितीवेळा किती वेगाने कार चालविली, हार्ड ब्रेकिंग, सीटबेल्ट लावला होता का अशा अनेक गोष्टींचा डेटा जमा करण्यात आला होता. या अलिशान कंपन्यांच्या कारमध्ये चिप लावलेल्या असतात. त्यामध्ये हा डेटा सेव्ह केलेला असतो. आता इलेक्ट्रीक स्कूटरमध्येही अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

पोर्शे कंपनीचे तंत्रज्ञ या कारची तपासणी करत आहेत. यामध्ये बिल्डर बाळाने अपघात केला तेव्हाचा कारचा असलेला वेग, वेळ, कितीवेळा कार हार्ड ब्रेकिंग करण्यात आली, कितीवेळा वेगाने चालविण्यात आली याचा डेटा या आरटीओला दिला जाणार आहे. तसेच कारमध्ये इनबिल्ट डॅशकॅम होते. त्याचेही रेकॉर्डिंग मिळविण्यात आले आहे. या सर्व माहितीचा वापर बिल्डर बाळाविरोधातील भक्कम पुराव्यांसाठी केला जाणार आहे.

बिल्डर विशाल अग्रवालच्या वकिलांनी पोर्शे कारमध्ये समस्या होती, असा दावा कोर्टात केला होता. याची तक्रारही कंपनीकडे केलेली आहे, असाही युक्तीवाद त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोर्शेची टीम पुण्यात आली आहे. यामुळे हा दावाही खरा की खोटा हे ठरविण्यास मदत मिळणार आहे.

ब्लड सॅम्पल अहवालच पुरावा नाही…
कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन बाळाला ताब्यात घेण्यात आले. अपघातानंतर सकाळी नऊच्या सुमारास बाळाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्त तपासणी अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना या अहवालाचा संशय आल्याने १९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास औंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन बाळाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल रविवारी (दि. २६) पोलिसांना मिळाले. दोन्ही अहवालात मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नाही. या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले असून ससूनच्या डॉक्टरांनीही ब्लड सॅम्पल बदलल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *