महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। Joe Burns: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जो बर्नने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आता ऑस्ट्रेलिया सोडून इटलीकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय. यामागेचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान आता तो इटली संघाकडून खेळताना त्यांना 2026 टी20 वर्ल्ड कपची पात्रता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.
त्याने हा निर्णय त्याच्या भावाच्या आणि आजोबांच्या सन्मानार्थ घेतला आहे. त्याच्या भावाचे यावर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. तो भावाच्या स्मृतीप्रीत्यर्थ 85 क्रमांकाची जर्सीही घालणार आहे.
बर्न्सचे कुटुंब मुळचे इटलीचे असून त्याचे आजी आजोबा अनेक वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले होते. त्यामुळे जो बर्न्सचा जन्मही ऑस्ट्रेलियामध्येच झाला. ऑस्ट्रेलियामध्येच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले.
तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रतिनिधित्व केले. त्याने 23 कसोटी सामने खेळताना 4 शतकांसह 1442 धावा केल्या. तो ऑस्ट्रेलियाकडून अखेरचा सामना 2020 मध्ये भारताविरुद्ध खेळला.
दरम्यान, बर्न्सला त्याचा देशांतर्गत संघ क्विन्सलँडने गेल्या हंगामात खेळण्याची संधी दिली नव्हती. तसेच त्याला 2024-25 वर्षाचा करारही दिलेला नाही.
त्यानंतर मंगळवारी (28 मे) त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत तो इटलीकडून खेळणार असल्याचे स्पष्ट केले. त्याने त्याच्या इटली संघाच्या जर्सीचा आणि त्याच्या भावाच्या क्लब क्रिकेटमधील संघाच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर 85 क्रमांकही लिहिला आहे.
तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘हा केवळ क्रमांक आणि जर्सी नाही. हे त्या लोकांसाठी आहे, जे वरून अभिमानाने पाहात आहेत. फेब्रुवारीमध्ये माझ्या भावाचे निधन झाले. 85 हा क्रमांक त्याने त्याच्या अखेरच्या संघाकडून नॉर्दन फेडरल्सकडून खेळताना घातला होता आणि 1985 त्याचे जन्मसाल देखील आहे.’